टाकेद गटातील अनेक गावे ही आदिवासीबहुल आहेत. या परिसरात पाऊसही मोठ्या प्रमाणावर पडतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक रस्ते खराब होत असतात. छोट्या-छोट्या वाड्या व पाड्यांपासून मुख्य गावांमध्ये पोहचणारे सर्व रस्ते पावसाळ्यात चिखलमय झालेले असतात. त्यामुळे या रस्त्याने वाहने चालविता येत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला झोळीत टाकून चिखलवाट तुडवत दवाखान्यात न्यावे लागते. अनेकदा रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहचला नाही तर त्यास जीवही गमवावा लागतो. खराब झालेल्या ह्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याची मागणी गेल्या तीन-चार वर्षांपासून करण्यात येत होती. प्रवास करताना त्रस्त झालेल्या या भागातील जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ग्रामविकास विभागाकडून रस्ते व पूल परीरक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत पाच रस्ते मंजूर करून घेतले आहेत.
इन्फो
या गावांचे होणार दळणवळण सुलभ
प्रत्येक एक किमी रस्त्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. एकूण पाच रस्त्यांसाठी १ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. आधारवड ते वासाळी, मांजरगाव ते ठाकूरवाडी, इंदोरे ते जाधववाडी, मांजरगाव ते गोडसेवाडी, इंदोरे ते माळवाडी अशा पाच रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यातून छोट्या-छोट्या वाड्या गावांशी जोडल्या जाणार आहेत. विशेषतः पक्क्या रस्त्यांअभावी वैद्यकीय सेवेला मुकणाऱ्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून या रस्त्यांचे काम सुरू केले जाणार आहे.