नाशिक : वीस दिवसांपुर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी बारा वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. या महापूराचा फटका गंगापूर-गोवर्धन शिवारात असलेल्या वनविभागा पश्चिम नाशिकच्या रोपवाटिकेसह सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिकेला बसला. गंगाकाठ रोपवाटिका पुर्णपणे पाण्यात बुडाल्याचे चित्र होते कारण येथील पूलावरून महापूराचे पाणी वाहत होते. या दोन रोपवाटिकांमधील सुमारे दीड लाख रोपांचे नुकसान झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
३३कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी रोपे रोपवाटीकांमध्ये आंबा, आवळा, हिरडा, रिठा, अशोका, महारूख, रूद्राक्ष, कदम, उंबर, बेल, पेरू, कैलासपती, जास्वंद, शिलारोप, बांबु, खाया, कतरजिव, चिंच, वड, पिंपळ, जांभुळ, सिताफळ यांसारख्या विविध प्रजांतीच्या रोपांचे संगोपन करण्यात येते. त्यानंतर योग्य वाढ झालेली रोपे दरी-मातोरी, शिलापुर, मुंगसारे, ओढा, पिंपळगाव, तळेगाव, वाढोची या भागांमधील ग्रामपंचायतींना ३३कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी पुरविली जाणार आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करावयाचे आहे. अद्याप टार्गेट ९५ टक्क्यांपर्यंत आले आहे.