ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. 4 - शिर्डीत रामनवमी उत्सवाची सोमवारपासून भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई दर्शनासाठी लाखो भाविकांच्या मांदियाळीने साईंगरी फुलून गेली आहे. साई नामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत रोशनाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पुजा करून साईमुर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला. साईबाबांना मंगलस्नानही कावडीतून आणलेल्या जलाने करण्यात आले. दरम्यान सकाळी काकड आरती नंतर बाबांची पोथी, विणा आणि प्रतीमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
आज मध्यान्ह आरती अगोदर साईमंदिरासमोर रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी रामजन्माचा मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले. शिर्डीतील रामनवमी उत्सवाच यंदाच हे १०५ व वर्ष आहे. भाविकांमघ्ये साईभेटीचा आनंद ओसंडुन वाहत आहे.
साई समाधी मंदिरासमोर हनुमान यांची मुर्ती असलेला ५० फुटी देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा भाविकांच लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक विद्युत रोषनाईने नटलेली महाद्वाराची प्रतिकृती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. मुंबई येथील द्वारकामाई मित्र मंडळाने स्वखर्चाने ही प्रतिकृती साकारली आहे. यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा ऊपयोग करण्यात आला आहे.
रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात.
शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतूर झालेला भक्तगण साई मूर्तीची केवळ एक झलक पाहाण्यासाठी असुरलेला असतो. तीन दिवस चालणा-या या उत्सवातील उर्जा भाविकाला वर्षभर पुरणारी असते. त्यामुळेच हा उत्सव याची देहि याची डोळा अनुभवन्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक साई दरबारी दाखल झाले आहेत. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा याकरिता साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, अनेक भाविकांनी साईंना देणग्या दिल्या, एका भाविकाने 35 लाख रुपये किमतीचे चांदीचे मखर द्वारकामाई मंदिरासाठी दिले, तर एकाने 12 किलो सोन्याचे कठडे समाधीला बसवले. एका भाविकाने दोन हजाराच्या नोटांची माळ बनवून बाबांना अर्पण केली, या हाराची किंमत दोन लाख रुपये आहे.