लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : घंटागाडीचा पंचवटी विभागातील माजी ठेकेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरुद्ध कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न केल्याप्रकरणी महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला संपूर्ण बिले अदा करणारे माजी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे हेसुद्धा संशयाच्या फेऱ्यात अडकले असून, त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. महापालिकेने मागील पंचवार्षिक काळात विभाग स्तरावर घंटागाडीचा ठेका दिला होता. त्यात पंचवटी विभागाचा ठेका ठाणे येथील समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता. सदर ठेकेदाराने नंतर उपठेकेदार नेमून दिला होता. संबंधित ठेकेदाराकडून घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतन नियमित अदा केले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार आरोग्य विभागाकडे प्राप्त होत असत शिवाय, अनियमित घंटागाडीच्याही तक्रारी लोकप्रतिनिधींकडून वारंवार केल्या जात असत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारला होता. दरम्यान, संबंधित ठेकेदाराची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी संपूर्ण बिले अदा केली परंतु, ठेकेदाराने घंटागाडी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१६ चे वेतन अदा केले नाही. वारंवार नोटिसा देऊनही ठेकेदाराने वेतन दिले नाही. सदर ठेकेदाराची सुमारे ३६ लाखाच्या आसपास सुरक्षा रक्कम महापालिकेकडे जमा आहे, परंतु त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होऊ शकत नाही.
घंटागाडीच्या माजी ठेकेदारावर गुन्हा
By admin | Updated: June 29, 2017 00:26 IST