महापालिकेेने सुमारे अडीचशे कोटी रुपयांची कामे करण्यासाठी निविदा मागविल्यानंतर त्यात डांबर प्लांटसंदर्भात घातलेली अट जाचक हेाती. त्यात नाशिक शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर डांबर तयार करण्याचा प्लांट असला पाहिजे आणि निविदा भरण्याच्या आधी महापालिकेकडून जागेच्या अंतराबाबतचा दाखला घेऊन तो निविदेला जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र, अशाप्रकारे निविदा मिळण्याच्या आतच डांबर प्लँट कोण उभारणार, असा प्रश्न असून, त्यातच जे स्थानिक स्तरावर काम करत आहेत, अशा ठेकेदारांसाठी महापालिकेने ही अट घातल्याची तक्रार ठेकेदार कंपनीने उच्च न्यायालयात केली होती. निविदेच्या अगोदरच महापालिकेकडून डांबर प्लांटबाबत अंतराचे प्रमाणपत्र घेण्याची अट घालण्यात आल्याने निविदा कोण भरणार, हे अगोदरच स्पष्ट होणार असल्याने गोपनीयतेला अर्थच राहणार नाही, अशीदेखील याचिकाकर्त्या कंपनीची तक्रार होती. या याचिकेवर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार होती. तोपर्यंत महापालिकेला कार्यवाहीस स्थगिती देण्यात आली होती. मात्र, या तारखेच्या आतच ठेकेदार कंपनीने माघार घेतली आहे. त्यामुळे अडीचशे कोटी रुपयांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे, असे शहर अभियंता संजय घुगे यांनी सांगितले.
अडीचशे कोटींच्या रस्त्यांच्या कामांतील अडथळे दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST