नाशिक : महापालिकेच्या गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ पैकी १५२ ओट्यांसाठी जाहीर लिलावप्रक्रिया राबवून सात महिन्यांचा कालावधी लोटला तरी, अद्याप एकाही भाजीविक्रेत्याने मंडईत व्यवसायाला सुरुवात केलेली नाही. सदर विक्रेत्यांनी भाडेही अदा न केल्याने त्यांच्या अनामत रकमेतून भाडे रक्कम कपात करत महापालिकेने ओट्यांचा फेरलिलाव करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, १२ किराणा व्यावसायिकांनी महापालिकेची रितसर परवानगी घेत मार्केटमध्ये मांडणी उभारून व्यवसायाला प्रारंभ केल्याने मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढण्यास मदत होणार आहे. महापालिकेने गणेशवाडी येथे सुमारे ६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या भाजीमंडईमधील ४६८ पैकी १५२ ओट्यांसाठी लिलावप्रक्रिया पूर्ण करून सात महिने उलटले, तरी अद्याप एकाही विक्रेत्याने मंडईत व्यवसायाला सुरुवात केलेली नाही. न्यायालयाने गोदाघाटावरील भाजीमार्केट हटविण्याचे आदेश जून महिन्यात दिल्यानंतर महापालिकेने गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांसाठी दि. १० जून २०१५ रोजी लिलावप्रक्रिया राबविली होती. या लिलावात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांकडून महापालिकेने प्रत्येकी पाच हजार रुपये अनामत रक्कम घेतली होती. लिलावात १५२ ओट्यांना बोली बोलली जाऊन महापालिकेला महिनाभराचे भाडे २ लाख ४३० रुपये प्राप्त झाले होते, तर अनामत रकमेच्या माध्यमातून ७ लाख ६० हजारांचा महसूल खजिन्यात जमा झाला होता. उर्वरित ३१६ ओट्यांना मागणीच न आल्याने त्यांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला होता. त्यानंतर ३१६ ओट्यांसाठी पुन्हा लिलावप्रक्रिया राबविली असता त्यातील २० ओट्यांचाच लिलाव होऊ शकला, तर २९६ ओट्यांना प्रतिसादच मिळाला नाही. दरम्यान, सात महिन्यांपूर्वी ज्या १५२ ओट्यांचा लिलाव झाला त्या लिलावधारक संबंधित भाजीविक्रेत्यांनी मार्केटकडे पाठ फिरविली. संबंधितांनी उर्वरित भाडे रक्कमही महापालिकेकडे भरली नाही. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या अनामत रकमेतूनच भाडे वसुली केली. परंतु पुढे भाडे भरले न गेल्याने महापालिकेने संबंधितांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली असून फेरलिलावाची तयारी चालविली आहे. (प्रतिनिधी)
ओट्यांचा होणार फेरलिलाव
By admin | Updated: February 4, 2016 23:38 IST