त्र्यंबकेश्वर : येथे झालेल्या पहिल्या शाहीस्नानादरम्यान प्रत्येक आखाड्याने मिरवणुकीसोबत आणलेल्या अनेक ट्रॅक्टर व रथांमुळे निर्धारित वेळेला होत असलेला विलंब पहाता पोलीस प्रशासनाने आखाड्यांना ट्रॅक्टरची संख्या कमी करण्याची केलेली विनंती काही आखाड्यांनी स्वीकारली, तर काहींनी सपेशल नाकारली आहे.सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाल्यापासून येथील दहा आखाड्यांनी आपापल्या ध्वजारोहण व पेशवाई सोहळ्यांमार्फत भव्य मिरवणुका, ट्रॅक्टर, डीजे, बॅण्डपथक, कलापथक आदिंद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याचा सपाटा लावला होता. पहिल्या शाहीस्नानादरम्यानही सर्व आखाड्यांमध्ये तीव्र चढाओढ पहायला मिळाली. मात्र यामुळे निर्धारित वेळेत प्रत्येक आखाड्याचे शाहीस्नान होऊन पुढच्या आखाड्याला मार्ग मोकळा करून देताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. आखाड्यांनी ट्रॅक्टरची संख्या कमी केल्यास सर्व आखाड्यांना निर्धारित वेळेत स्नान करून मंदिरात रवाना होता येणार असल्याने तशा प्रकारची विनंती पोलीस प्रशासनाने येथील सर्व आखाड्यांना केली होती. या विनंतीला काही आखाड्यांनी सकारात्मक, तर काही आखाड्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. येथील अग्नी आखाड्याने ट्रॅक्टरची संख्या अगदी कमी म्हणजे दोन ते तीनच ठेवण्याचे ठरविले असून, प्रमुख महंत, महामंडलेश्वर वगळता इतर सर्व जण पायी चालणार असल्याचे सांगितले. आम्ही आमच्या देवता डोक्यावर घेऊन पायी येऊ व निर्धारित वेळेत शांततेत स्नान करू, अशी माहिती अग्नी आखाड्याचे ठाणापती दुर्गानंद ब्रह्मचारी यांनी दिली. अशीच भूमिका पंच दशनाम आवाहन आखाड्याने घेतली आहे. मुळात आवाहन आखाडा शाहीस्नानावेळी केवळ एकच ट्रॅक्टर मिरवणुकीत ठेवतो. त्यांच्या मुख्य महंतांसाठी तो आवश्यक आहे. पुढील शाहीस्नानातही ते केवळ एकच ट्रॅक्टर सोबत ठेवणार आहे. त्या व्यतिरिक्त सर्व साधू-महंत देवतांसह पायीच शाहीस्नानाला येणार असल्याची माहिती आवाहन आखाड्याचे महंत भारद्वाजगिरी महाराज यांनी दिली.निर्मल आखाड्यानेही अशीच भूमिका घेतली आहे. निर्मल आखाड्याने पहिल्या शाहीस्नानातील मिरवणुकीत तीन ट्रॅक्टर सहभागी केले होते. पुढील पर्वणीत ट्रॅक्टरची संख्या वाढविण्याचे कुठलेही नियोजन नसून शाहीस्नानाची मिरवणूक शांततेत व निर्धारित वेळेत कुशावर्तावर व देवळात पोहोचेल याची आम्ही काळजी घेऊ, असे निर्मल आखाड्याचे ठाणापती महंत राजेंद्रसिंह यांनी सांगितले.निरंजनी आखाड्याचे प्रमुख महंत व आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांनी सांगितले की, पूर्वी होते तेवढेच ट्रॅक्टर दुसऱ्या पर्वणीतही असतील. अर्ध्या तासाच्या कालावधीत निरंजनी आखाड्याचे सर्व साधूगण आणि भाविक हे शाहीस्नान पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुशावर्त तीर्थावर जरुरीपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी असून, त्यांची संख्या कमी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सहकार्याची भूमिका अटल, महानिर्वाणी, आनंद, जुना आखाडा आदि सर्व आखाड्यांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)
शाही मिरवणुकीत ट्रॅक्टरची संख्या घटणार
By admin | Updated: September 5, 2015 22:15 IST