नाशिक : पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे शाही मिरवणूक पाहण्यास मुकलेल्या भाविकांसाठी रविवारी (दि. १३) सकाळी पुन्हा हा शाही थाट पाहण्याची संधी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द्वितीय शाहीस्नानानिमित्त रविवारी सकाळी ही मिरवणूक निघणार असून, फुलांनी सुशोभित केलेले रथ, उंट-घोड्यांवर विराजमान साधू-महंत, श्री महंत-महंतांची सहाशेहून अधिक वाहने, भजन-संकीर्तन करणारे पन्नास हजारांहून अधिक साधू... डोळ्यांचे पारणे फेडणारे मर्दानी खेळ असा लवाजमा नाशिककरांना अनुभवता येणार आहे. यावेळी तिन्ही आखाड्यांच्या खालशांत वाढ झाल्याने तसेच साधूंचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने गेल्या मिरवणुकीच्या तुलनेत रविवारी साधूंची संख्या दुपटीने वाढणार असल्याचे प्रमुख आखाड्यांकडून सांगण्यात आले. कुंभमेळ्यात साधूंच्या शाहीस्नानाइतकेच आकर्षण असते ते स्नानापूर्वी निघणाऱ्या शाही मिरवणुकीचे. नाशिकमधील साधुग्राम निवासी वैष्णवपंथीय साधूंचे आखाडे इष्टदेवतांना घेऊन मिरवणुकीने एकापाठोपाठ शाहीस्नानासाठी पवित्र रामकुंडाकडे रवाना होतात. साधूंच्या शौर्य व वैभवाची साक्ष देणाऱ्या या मिरवणुकीला ‘शाही मिरवणूक’ म्हटले जाते. गेल्या २९ आॅगस्ट रोजी कुंभमेळ्याच्या प्रथम पर्वणीला शहरातून शाही मिरवणूक निघाली खरी; मात्र पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे भाविकांना ती डोळ्यांत साठवता आली नव्हता. त्यामुळे यंदा पोलिसांंनी बंदोबस्ताचे फेरनियोजन करीत मिरवणूक सर्वांना पाहता येईल, अशी ग्वाही दिली आहे. तथापि, त्यात कितपत तथ्य आहे, हे प्रत्यक्ष मिरवणुकीच्या वेळीच समजणार आहे. प्रथम शाहीस्नानाच्या वेळी शाही मिरवणुकीत निर्वाणी अनी, दिगंबर अनी व निर्मोही अनी असा आखाड्यांचा क्रम होता. यावेळी त्यात बदल होणार असून, आता निर्मोही अनी आखाडा पहिल्या क्रमांकावर राहील, तर निर्वाणी अनी आखाडा तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून, दिगंबर अनी आखाडा मध्यमागी राहणार आहे. रविवारी पहाटे साधू स्नान करून इष्टदेवतांसह मिरवणुकीत सहभागी होतील. साधुग्राममधील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सकाळी ६ वाजता निर्मोही अनी आखाड्याची मिरवणूक निघेल. ६.३० वाजता दिगंबर अनी, तर ७ वाजता निर्वाणी अनीच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. प्रत्येक आखाड्याच्या मिरवणुकीत दोनशे मीटरचे अंतर राहणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिर, काट्या मारुती पोलीस चौकी, गणेशवाडी देवी चौक, पंचवटी आयुर्वेदिक कॉलेज, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, सरदार चौक या मार्गे मिरवणूक रामकुंडावर पोहोचेल. तेथे निशाण व इष्टदेवतेचे विधिवत पूजन केले जाईल. इष्टदेवता हनुमानाला स्नान घातले जाईल. त्यानंतर आखाड्याच्या प्रमुख श्री महंतांचे व नंतर साधूंचे स्नान होईल. स्नानानंतर ज्या क्रमाने आखाडे दाखल झाले, त्याच क्रमाने ते परतीच्या मार्गाने साधुग्रामकडे रवाना होतील. दरम्यान, शाही मिरवणुकीची साधुग्राममध्ये जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खालशांच्या संख्येत वाढवैष्णव पंथातील तिन्ही अनी आखाड्यांच्या खालशांची संख्या ६३७ इतकी होती. त्यांत दिगंबर अनीच्या ४0५, निर्वाणी अनीच्या १६२, तर निर्मोही अनीच्या ६0 खालशांचा समावेश होता; मात्र प्रथम शाहीस्नानानंतर साधुग्राममध्ये महंताई समारंभांनंतर खालशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता दिगंबर अनीचे ४५0, निर्वाणी अनीचे १७५, तर निर्मोही अनीचे खालसे ७२ वर पोहोचले आहेत. असे असेल मिरवणुकीचे स्वरूपप्रारंभी आखाड्याचा फलक, त्यामागे बॅण्डपथक, निशाण व इष्टदेवता, त्यानंतर श्री महंतांचा रथ, आखाड्याचे महंत, त्यानंतर खालशांचे वाहन व त्या-त्या खालशातील महामंडलेश्वर, साधू अशी प्रत्येक आखाड्याची मिरवणुकीतील रचना राहणार असून, तिन्ही आखाडे एकापाठोपाठ याच रचनेनुसार मार्गक्रमण करतील.