नाशिक : शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मास्क न लावणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेने आणखी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून आता मास्क न लावणाऱ्यांना दोनशेऐवजी पाचशे रुपयांचा दंड होईलच, शिवाय गुन्हा दाखल होणार आहे.
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात आदेश निर्गमित केले असून ते स्वच्छता निरीक्षक आणि संबंधींना पाठवले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस कोरोना नियंत्रणात आल्यानंतरदेखील केवळ आरोग्य नियमांचे पालन न झाल्याने पुन्हा कोरोना वाढत गेला आहे. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वेगाने फैलाव होत आहे. महापालिकेने आधी दोनशे रुपयांचा दंड केला, त्यानंतर एक हजार रुपये अशी दंडात वाढ केली. परंतु नंतर दंड वसूल करणे हा उद्देश नसल्याचे आयुक्तांनी सांगितले आणि दंडाची रक्कम पुन्हा दोनशे रुपयेच केली. मात्र, त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांची संख्या वाढत असून दुसरीकडे दंड भरूनही नियमांचे उल्लंघन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आता दंडाची रक्कम वाढवून ती दोनशेऐवजी पाचशे रुपये केली आहे. शिवाय मास्क न लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत. तसेच विनामास्क व्यक्तींना पकडून त्यांची स्वॅब घेऊन आरटीपीसीआर म्हणजेच कोरोना चाचण्या घेण्यात येणार आहे.
इन्फो.
सुपर स्प्रेडर्सचा शोध घेणार
नाशिक महापालिकेच्या वतीने सुपर स्प्रेडर्स शोधण्याची मोहीम वेगाने राबवली जात आहे. त्यामुळे आता मास्क न वापरणाऱ्यांना दणका बसणार आहे.