नाशिक : मुंबईत राज ठाकरे यांनी मातोश्रीवर हजेरी लावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेत युती होण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. विशेषत: हीच संधी साधून मनसेच्या वतीने सोशल मीडियावरच युती होणार असल्याचे व्हायरल केले जात आहे. त्यातही सेनेत प्रवेश करणाऱ्यांनो सावधान, तुमची अवस्था घर का ना घाट का अशी होऊ शकते, अशा पोस्ट पाठविल्या जात आहेत.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीही राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ शकतात, अशी अटकळ बांधणाऱ्यांना शुक्रवारच्या राज आणि उद्धव भेटीने बळकटी मिळाली आहे. उभयतांकडून काहीही दावे प्रतिदावे केले जात असले तरी सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना उकळी फुटली आहे. विशेषत: उभय पक्षांचे लक्ष महापालिका निवडणुकीत भाजपाला रोखण्याचे असल्याने या राजकीय स्वार्थासाठी ते एकत्र येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया उभय पक्षांतून व्यक्त होत आहेत. त्यातच मनसेच्या वतीने काहींनी मनसे-शिवसेना युती होणार असेच व्हायरल केले आणि मनसेला लागलेली गळती थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. मनसे आणि शिवसेनेत युती होणार असल्याने शिवसेनेत जाणाऱ्यांनो सावधान, तुमची अवस्था घर का ना घाट का अशी होऊ शकते असे त्यात नमूद केले आहे. उभय पक्षात युती झाली तर सेनेत गेलेल्यांना उमेदवारी न देण्याच्या अटीवर युती होऊ शकते, असे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे युती का होईल याची कारणे पोस्टमध्ये या कार्यकर्त्यांनी नमूद केली असून भाजपा शिवसेनेला चांगली वागणूक देत नाही, प्रादेशिक पक्ष संपविण्याचे भाजपाचे धोरण आहे, त्या विरोधात दोघे बंधू एकत्र येऊ शकतात. त्याचबरोबर शिवसेनेला मुंबईत, तर मनसेला नाशिकमध्ये सत्ता हवी आहे, त्यामुळे युती होऊ शकते असे नमूद करताना चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार याप्रमाणे रचना केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच मनसेकडूनच युतीची हवा पसरवली जात आहे. (प्रतिनिधी)
आता सेना-मनसेच्या युतीची चर्चा
By admin | Updated: August 2, 2016 01:37 IST