सातपूर : शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांप्रकरणी महापालिकेने अखेरीस कारवाई करण्यासाठी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. तथापि, धार्मिक स्थळे बांधणाऱ्यांना सोडून थेट धार्मिक स्थळांना नोटिसा चिकटविण्यात येत आहेत. महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने शनिवारी अशाप्रकारच्या नोटिसा बजावण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत स्थळे हटविण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानुसार नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांना नोटिसा चिटकविण्यात आल्या आहेत. या धार्मिक स्थळांमुळे रस्त्याला अडथळा निर्माण होत असून, १५ दिवसांत हे धार्मिक स्थळ स्थलांतरित करण्यात यावे, असे नोटिसीत आवाहन करण्यात आले आहे. अजूनही उर्वरित चार अनधिकृत धार्मिक स्थळांना उद्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी गोसावी यांनी दिली. (वार्ताहर)
अनधिकृत बांधकामाची देवालाच दिली नोटीस
By admin | Updated: October 25, 2016 01:50 IST