नाशिकरोड : भारत प्रतिभूती-चलार्थ पत्र मुद्रणालयासह महामंडळाच्या देशातील नऊ युनिटमधील कामगारांना महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. अधिकारी व आयडीए पॅटर्न स्वीकारलेल्यांना बोनस नाकारण्यात आला आहे. महामंडळाच्या देशातील नऊ युनिटमध्ये २०१६-१७ मध्ये एकूण कामगार संख्या १० हजार ३५४ होती. २०१७-१८ या काळात ती संख्या ९ हजार ६३८ वर येऊन ठेपली असतानासुद्धा मुद्रणालय महामंडळाला ६६३.७७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यापोटी महामंडळ व्यवस्थापनाने केंद्रीय अर्थराज्यमंत्री अरुण जेटली यांच्याकडे २०४.८७ कोटी रुपयांचा लाभांश सुपूर्द केला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर मुद्रणालय कामगारांनी कुठलीही सुट्टी न घेता अहोरात्र काम करून देशाची नोटाची गरज भागविण्याचे काम केले. मुद्रणालय कामगार दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करत असल्याने महामंडळाला नफा होत असतानादेखील कामगारांच्या दिवाळी बोनसमध्ये वाढ न करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.नोटाबंदीच्या निर्णयानंतर कामगारांनी राष्टÑीय व साप्ताहिक सुट्टी न घेता नोटटंचाई निर्माण होऊ नये म्हणून अविरतपणे काम करून मोठे योगदान दिले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशभरातील कामगारांना सुट्टी घोषित केली असतानासुद्धा मुद्रणालय कामगार कामावर होते. तरीदेखील कामगारांच्या दिवाळी बोनसमध्ये वाढ न झाल्याने कामगारांचा भ्रमनिरास झाला आहे. - रामभाऊ जगताप, माजी सरचिटणीस, मजदूर संघ
नोट प्रेस कामगारांना दहा हजार रुपये बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:46 IST