नाशिक : बर्ड फ्लूमुळे कुठल्याही पोल्ट्री उत्पादनांना कोणताही धोका नसून पोल्ट्री उत्पादने सुरक्षित आहेत; परंतु सोशल मीडियावर याविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांसह मका व सोयाबीन उत्पादकही संकटात सापडल्याचे सांगतानाच कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोल्ट्री फार्मर्स ब्रिडर्स असोसिएशनने केले.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पोल्ट्री उत्पादनांविषयी अनेक गैरसमज पसरले होते. आता त्यातून सावरत असताना आता बर्ड फ्लूचा प्रसार होत असल्याच्या चर्चांमुळे पुन्हा व्यावसायावर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका मका व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचे यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनापूर्वी मका २२०० रुपये प्रतिक्विंटल होता. परंतु कोरोनासंदर्भात पोल्ट्री व्यवसायाबाबत गैरसमज पसरल्याने मकाचे दर सहाशे ते सातशे रुपयांनी घसरले आहे. यातील बराच माल पडून राहिल्याने आणि पुन्हा बर्ड फ्लूचा गैरसमज पसरल्याने पोल्ट्री व्यावसायावर परिमाण होऊन लागल्याने मक्याचे भाव वाढू शकलेले नाहीत. त्यासोबतचतच सोयाबीन उत्पादकांनाही यामुळे फटका बसल्याचे पोल्ट्री फार्मर्स ॲण्ड ब्रिडर्स असोसिएशनचे राज्य सचिव उद्धव अहिरे यांनी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. शहाजी देशमुख, ए. जे. पोल्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. अनिल फडके, जिल्ह्याचे उपायुक्त डॉ. बाबूराव नरवडे, एसकेडी ग्रुपचे महाव्यवस्थापक संजय देवरे, वेंकीज ग्रुपचे उपमहाव्यवस्थापक डॉक्टर संदीप कुलकर्णी, सुगुना पोल्ट्री फार्मचे महाव्यवस्थापक डॉ. महेश शिवणकर आदी उपस्थित होते.