तालुक्यातील रुग्णालयांमध्ये बेड शिल्लकच नाही. बेडसाठी प्रतीक्षा यादी आहे तर अक्षरश: रुग्णांचे नातलग हाणामारीपर्यंत येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले . चांदवड तालुक्यात सद्यस्थितीत १३१२ रुग्ण आहेत . तर आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चांदवड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. चांदवड तालुक्यातील कोविड सेंटर हे चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील ट्रामा केअर सेंटरमध्ये असून तेथे ३० ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. रुग्णांना तातडीने लगेच बेड मिळत नाही. कारण वेटिंगवर दररोज १० ते १२ नंबर असतात. या ऑक्सिजन बेडकरिता अनेक रुग्ण व त्यांचे नातलग व येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होत आहेत. दरम्यान, चांदवड तालुक्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या जागेत ५० बेडची मागणी केली आहे. येथील लसीकरण केंद्र गेल्या आठ दिवसांपासून जे. आर. गुंजाळ विद्यालयात हलविले असले तरी अद्याप या उपजिल्हा रुग्णालयात वाढीव बेडची व्यवस्था वरिष्ठ पातळीवर झालेली नाही. येथील कोविड सेंटर हे आहे त्या अपुऱ्या सुविधांमध्येही चालविण्यास येथील अधिकारी वर्ग तयार असताना वरिष्ठ कार्यालयाकडून मात्र त्यास मंजुरी मिळत नसल्याचे दिसत आहे.
चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई , वडगावपंगु, रायपूर, वागदर्डी, तळेगावरोही या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. काही गावांची कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तालुक्यात दोन ठिकाणी खासगी कोविड सेंटर उभारली आहेत. परंतु तेथेही ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. खासगी सेंटरमध्ये फक्त २९ ऑक्सिजन बेड आहेत. चांदवड तालुक्यात आतापर्यंत सर्वच ६४१८ रुग्णांची संख्या आहे. तर नगरपरिषद क्षेत्रात १६६५ रुग्ण, जिल्हा परिषद क्षेत्रात ४७५३ रुग्ण आहेत. घरी बरे होऊन परत गेलेले ५०१५ रुग्ण आहेत. तर ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इन्फो
हॉटस्पॉट गावे
चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई , वडगावपंगु, रायपूर, वागदर्डी, तळेगावरोही या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. याठिकाणी संबंधित ग्रामपंचायतींनी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली असली तरी रुग्णसंख्या मात्र वाढतानाच दिसून येत आहे.