नाशिक : एरव्ही महापौरपदाची नव्हे तर स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड असली तरी पालिकेच्या अर्धा किलोमीटर परिघात रस्ते बंद, मग आरडाओरड, काठ्यांचा धाक दाखवणे असे प्रकार करणाऱ्या पोलिसांनी मंगळवारी मात्र सुखद धक्का दिला. महापौरपदाची निवडणूक होत असताना राजीव गांधी भवनच्या परिसरातील कोणताही रस्ता बंद केला नाहीच, शिवाय सर्व वाहतूक सुरळीत ठेवल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वच नगरसेवक सहभाग घेत असतात, हे सर्व खरे असले तरी सभागृहातील राजकारणाचा नागरिकांना त्रास ठरलेलाच असतो. इतकेच नव्हे तर स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक या समितीच्या अवघ्या सोळा सदस्यांमध्येच असते. परंतु तरीही राजीव गांधी भवनच्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांना जणू संचारबंदी असते. निवडणूक सकाळी अकरा वाजता असली तरी पोलीस यंत्रणा सकाळी आठ- नऊ वाजेपासूनच या मार्गावर उभी राहते. टिळकवाडी सिग्नल ते राका कॉलनी आणि तरण तलाव ते टिळकवाडी दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येते. या परिसरात बॅँका, व्यावसायिक आणि रुग्णालये आहेत त्यामुळे नागरिकांना येथे कामे असतात. परंतु तेथे जाण्यासही नागरिकांना बंदी केली जाते. सीबीएसवरून येणारे बाहेरगावातील नागरिक आणि साऱ्यांचीची कोंडी होत असते. बरे तर पोलिसांशी संवाद साधणेही कठीण. आवाज काढला की पोलिसांच्या काठ्या पुढे येतात. त्यामुळे मंगळवारी असेच काहीसे होणार, अशी धास्ती असताना पोलीस यंत्रणेने सुखद धक्का दिला.