भाऊसाहेबनगर : गत दोन गाळप हंगामापासून गाळपाविना बंद असलेला निफाड सहकारी साखर कारखाना आगामी गाळप हंगामात चालू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मे. बॉम्बे एस. मोटर्स प्रा. लि. या कंपनीला सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंबंधीचा ठराव नवनियुक्त प्रशासक मंडळातील प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बुधवारी कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीत पारीत केला आहे.कारखान्यातील शिल्लक साखर विक्रीचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच साखर विक्री प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच मंत्री समितीच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील जे बंद कारखाने आहेत त्यांना वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सवलत मिळणार असून, यासंबंधीचा निर्णय दोन दिवसांत होणे अपेक्षित आहे. तसेच लवकरच वीजजोडणी होईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.कारखाना चालू करावा या मागणीसह प्रशासकीय मंडळाने पदभार स्वीकारावा यासाठी निफाड साखर कामगार सभेने रास्ता रोकोचा इशारा दिला होता, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पिंपळस रामाचे येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.कारखाना बॉम्बे एस मोटर्सला चालविण्यास देण्यासंबंधी प्रस्ताव विनाविलंब शासकीय स्तरावर पाठविण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.यावेळी प्राधिकृत मंडळाचे सदस्य जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देसले, तालुका उपनिबंधक महेश भंडागे, भागवतबाबा बोरस्ते, राजेंद्र डोखळे बॉम्बे मोटर्सचे संचालक सतपालसिंग ओबेरॉय, आनंदराव जाधव, सुधीर कराड कार्यकारी संचालक भागवत भंडारे कामगार संघटनेचे संतराव कडलग, संदीप मोगल, बी. जी. पाटील, विजय रसाळ, तसेच खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
निसाकाची चाके सहयोगी तत्त्वावर फिरणार
By admin | Updated: February 11, 2015 23:56 IST