नाशिक : निफाड नगरपंचायत निवडणुकीत भाजपा व शिवसेनेला प्रत्येकी पाच जागा मिळालेल्या असल्याने आणि निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती केलेली असल्याने युतीचाच नगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.काल (दि. १०) यासंदर्भात भाजपा व शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची एकत्रित बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे नगरसेवक राजाराम शेलार यांनी सांगितले. या बैठकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष विषय समित्यांचे सभापतिपदे, तसेच स्वीकृत नगरसेवक या विषयांवर चर्चा झाली. निफाड शहराचा विकास हा एक मुद्दा, तसेच नगरपंचायतींची निवडणूक एकत्रितपणे लढविल्यामुळे मतदारांनी दाखविलेला विश्वासाला तडा जाऊ नये, म्हणून पाच वर्षे एकत्रितपणे कामकाज करण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस राजाराम शेलार, मुकुंद होळकर, जावेद शेख, अनिल बिवालकर, इरफान सय्यद, शंकरराव वाघ, माणिक कुंदे आदि नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना-भाजपा युती झाल्याने युतीचाच नगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले असून, त्यात नगराध्यक्षपदासह उपनगराध्यक्षपद, स्थायी समिती सभापती व अन्य विषय समित्यांचे सभापती हे पाच वर्षांसाठी निवडण्यात येतील, की प्रत्येकी अडीच वर्षांचा कार्यकाळ ठरला, याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण असल्याने भाजपाच्या वतीने राजाराम शेलार हे इच्छुक असून, त्यांच्या निवडीवर युतीच्या वतीने शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
निफाडला युतीचा नगराध्यक्ष
By admin | Updated: November 11, 2015 00:13 IST