सातपूर : नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमा या उद्योजकांच्या संघटनेचे एकूण सभासद ३८००; मात्र वार्षिक सभेला उपस्थित केवळ ५०! अशा वातावरणातच मावळते अध्यक्ष रवि वर्मा यांच्याकडून नूतन अध्यक्ष संजीव नारंग यांनी पदभार स्वीकारला.निमा या संघटनेच्या घटनेनुसार निवडणूक झाल्यानंतर पहिल्या वर्षी मोठ्या उद्योगांच्या गटाला तर नंतरचे एक वर्ष लघुउद्योजकांच्या गटाला अध्यक्षपद मिळते. त्यानुसार रवि वर्मा यांची वर्षभराची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी निमाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लघु उद्योग गटातून संजीव नारंग यांनी पदभार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर निमाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष निशिकांत अहिरे, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर, खजिनदार विरल ठक्कर आदि उपस्थित होते. प्रारंभी मावळते अध्यक्ष वर्मा यांनी वर्षभराचा आढावा सादर केला. सर्व सदस्यांच्या सहकार्याने निमा इंडेक्स प्रदर्शन यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, मनीष कोठारी, विवेक गोगटे, रमेश वैश्य, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, माजी अध्यक्ष संदीप सोनार, व्हीनस वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नारंग यांनी सूत्रे स्वीकारली. बैठकीस प्रदीप बूब, किरण जैन, उदय खरोटे, मिलिंद राजपूत, उत्तम दोंदे, आशिष नहार, तुषार चव्हाण, राजेंद्र अहिरे, सुधाकर देशमुख उपस्थित होते.सातपूरसह अन्य ठिकाणच्या उद्योजक सभासद असलेली निमा ही जिल्ह्यातील मोठी संस्था आहे. या संघटनेचे ३८०० सभासद असून प्रत्यक्षात सभेस मात्र अवघे ५० सदस्य उपस्थित होते. त्याविषयी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या वार्षिक सभेत अन्य कोणतेही विषय चर्चेला येत नसले तरी त्यातून संघटनेचे गांभीर्य नष्ट होत असल्याची प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)निमाच्या वार्षिक सभेस अत्यल्प उपस्थितीमुळे रिकाम्या असलेल्या खुर्च्या. तर दुसऱ्या छायाचित्रात निमाचे मावळते अध्यक्ष रवि वर्मा यांच्याकडून सूत्रे स्वीकारताना संजीव नारंग.
निमाच्या सभेला उपस्थिती केवळ ५०
By admin | Updated: August 1, 2015 00:50 IST