नाशिक : केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत गरीब-गरजू बेघर व्यक्तींसाठी रात्र निवारा केंद्र उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला असून, लवकरच दोन ठिकाणे निश्चित केली जाणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली.केंद्र शासनाने सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना बंद करून त्याऐवजी दीनदयाळ अंत्योदय योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी बेघरांसाठी निवारा केंद्र गरजू व गरीब व्यक्तींसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ५० ते १०० बेघर व्यक्तींना आश्रय देण्याकरिता एक निवारा केंद्र उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. त्यानुसार, नगर परिषद प्रशासन संचालनालयाने नाशिक महापालिकेलाही सन २०१६-१७ या वर्षात दोन शहरी बेघर निवारा केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट्य दिलेले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. त्यासंबंधी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सहा ठिकाणे प्रस्तावित करण्यात आली. त्यातील दोन ठिकाणी निवारा केंद्र उभारले जाणार आहेत. रात्र निवारा केंद्र बांधण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार असून, केंद्राचे बांधकाम झाल्यानंतर पाच वर्षांसाठी देखभाल खर्च व त्या अनुषंगिक खर्च हा दीनदयाळ अंत्योदय योजनेतून करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी शासनाकडून निधी न मिळाल्यास त्याचा खर्च महापालिकेला करायचा आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सोमवारच्या महासभेत मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)निवारा केंद्रासाठी प्रस्तावित ठिकाणेस. नं. १८७ ‘ड’मधील जुन्या व्यायामशाळेच्या जागेत (सिन्नर फाटा)स. नं. २६९ मधील मनपाच्या जागेत (रेल्वे टर्मिनसजवळ)नाशिकरोड विभागीय कार्यालय जुनी इमारत, स्टेशनरोड.स. नं. ३३५ पंचवटी कुष्ठधामजवळ मनपाची ११ एकर जागा.मनपा इमारत दुसरा मजला, नारोशंकर मंदिरासमोर.कुष्ठधाम इमारत, संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ, तपोवन.
बेघरांसाठी उभारणार रात्र निवारा केंद्र
By admin | Updated: September 20, 2016 01:33 IST