नाशिक : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील नव्या बांधकामांना तीन महिन्यांपासून मनाई असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे लवादाच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यासाठी महापालिकेने सोमवारी याचिका दाखल केली असून, त्यामुळे लवकरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.पाथर्डी शिवारात महापालिकेचा कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू आहे; परंतु त्यामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याच्या नागरिक आणि शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. काहींनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे. महापालिकेला वेळोवेळी खतप्रकल्प योग्य पद्धतीने चालविण्यासाठी निर्देश देऊनही त्याचा उपयोग होत नसून, पालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने गेल्या ९ नोव्हेंबरला हरित न्यायाधिकरणाने महापालिका हद्दीत नवीन बांधकामांना मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नवीन बांधकाम प्रस्ताव दाखल करून घेतले जात नसल्याने बांधकाम ठप्प होण्याची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अभियंता, वास्तुविशारद संघटना यांच्याशीही चर्चा केली होती. अखेरीस सर्व बाबींचा विचार करून हरित लवादाकडे पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी ही माहिती दिली.नाशिक महापालिकेत बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार बांधकामांना परवानग्या दिल्या जातात. त्याचा आधार घेऊन ही पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती बग्गा यांनी दिली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प असलेला प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नव्या बांधकामांच्या परवानगीसाठी पालिका ‘एनजीटी’त
By admin | Updated: February 8, 2016 23:59 IST