नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २२ डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने राजभवनाने नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. येत्या ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन शोध समितीने केले आहे.कुलगुरू जामकर यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपुष्टात येत असल्याने विद्यापीठाने यासंदर्भात राजभवनाला गेल्या मे महिन्यातच कळविले होते. कुलगुरू निवड समितीसाठी नियुक्त करावयाच्या त्रिसदस्यीय समितीसाठी विद्यापीठाने चंदीगढ पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. चावला यांचे नाव राजभवनाकडे पाठविले होते. त्यानंतर राजभवनने अन्य दोन सदस्यांची नियुक्ती केली आहे. तर शोध समिती समन्वय अधिकारी म्हणून स्वर्णजित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शोध समितीने इच्छुक उमेदवारांकडून येत्या ७ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत. प्राप्त अर्जांमधून अंतिम पाच उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाईल. त्यातील एका उमेदवाराची कुलगुरू म्हणून निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
डिसेंबरमध्ये लाभणार नवीन कुलगुरू
By admin | Updated: November 12, 2015 00:21 IST