घोटी : भावना व्यक्त करण्यासाठी वाणी नाही अन् प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी कानही सक्षम नाहीत. तरी तारुण्याच्या उंबरठ्यावर भावी जोडीदाराची स्वप्न रंगविली अन् मनासारखा जोडीदार मिळाल्यावर रेशीमगाठ बांधून ते विवाहबद्धही झाले. मुंढेगाव आणि नाशिक येथील मूकबधिर वधू-वराची ही कहाणी. या जोडप्याचा विवाह कावनई येथे संपन्न झाला. विशेष म्हणजे या विवाहाला जिल्ह्यातील मूकबधिर तरुण-तरुणी वऱ्हाडी म्हणून उपस्थित होते.मूकबधिर म्हटले की, समाजाचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. त्यांच्या पालकांना त्यांची स्थळे जुळविताना खडतर स्थितीचा सामना करावा लागतो. अनेक मुली व मुलेही मूकबधिराशी विवाह करण्यास नकार देतात. मात्र मुंढेगाव येथील एका मूकबधिर युवकाने आपल्यावर आलेली संकटे समर्थपणे पेलत आयुष्यात मूकबधिर मुलीशीच विवाह करण्याची जिद्द मनात ठेवून केवळ मूकबधिर नाही तर आंतरजातीय विवाह करून जातीयतेची दरी दूर करण्याचा प्रयत्न केला. या मूकबधिर जोडप्याचा कावनई येथे साधेपणात विवाह संपन्न झाला.आपण केवळ मूकबधिर मुलीशीच विवाह करू असे त्याने सांगितले. मात्र मूकबधिर मुलगी मिळविणे हे पालकांसाठी दिवास्वप्न होते. अखेर सतीशचे घोटी येथील मामा पंढरीनाथ दुर्गुडे यांच्या सहकाऱ्याने नाशिक येथील सुरेश गुळवे यांची प्रियांका ही जन्मजात मूकबधिर मुलगी मिळून आली. दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही बाजूने हा विवाह पक्का करण्यात आला. आणि कावनई येथे साध्या पद्धतीने त्यांचा विवाह करण्यात आला. (वार्ताहर)
मूकबधिरांच्या आंतरजातीय विवाहाने नवा आदर्श
By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST