मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटोदा येथील साठवणूक तलावावर बसविण्यात आलेल्या उच्च क्षमतेच्या वीजपंपाची चाचणी आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आली. यावेळी आमदार पंकज भुजबळ, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजाभाऊ पगारे उपस्थित होते.मनमाड शहरासाठी कार्यान्वित करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाटोदा येथील साठवण तलावावार नवीन पाच वीज पंप बसविण्यात आले आहे. छगन भुजबळ यांनी तलावावर भेट देऊन कामाची पाहणी केली व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येत असल्याने मनमाडकरांना सहा वर्षांपूर्वी पाणीप्रश्न सोडवण्याचा दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. या नवीन वीजपंपाची कळ भुजबळ यांच्या हस्ते दाबून चाचणी घेण्यात आली. साठवण तलावावर बसविण्यात आलेल्या २७० अश्वशक्तीच्या मशिनरीमुळे ताशी सहा हजार लिटर पाणी उपसा शक्य होणार आहे. यामुळे रोटेशन काळात पाटोदा साठवण तलावातून वागदर्डी धरण भरून घेता येणे शक्य होणार आहे. नगरसेवक धनंजय कमोदकर, योगेश पाटील, बब्बू कुरेशी, महेंद्र शिरसाठ, मजिपचे कार्यकारी अभियंता लोंगाणी, पाणीपुरवठा अभियंता अहिरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
पाटोदा साठवणूक तलावावर नवीन वीजपंपाची चाचणी
By admin | Updated: January 21, 2016 22:13 IST