नाशिक : सायबर गुन्ह्यांमध्ये विविध स्तरांतील व्यक्तींकडून इंटरनेटचा वापर करताना झालेली अतिघाई किंवा घ्यावयाची काळजी याबाबतची उदासीनता आढळून येते. इंटरनेटच्या चुकीच्या व अतिवापरामुळे पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कलह वाढत असून, आजच्या संगणकधारित युगात मुलांवर संस्काराबरोबरच सायबर संस्कार करणे तसेच एटीकेट्सबरोबरच नेटीकेट्स शिकविणे व कॅरेक्टरबरोबरच सायबर कॅरेक्टर घडविणे गरजेचे असल्याचा सूर ‘सायबर सिक्युरिटी : गरज प्रत्येकाची’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला. सीएमसीएस महाविद्यालयात सुरू असलेल्या दोनदिवसीय चर्चासत्राचे तृतीय सत्र शनिवारी पार पडले. या चर्चासत्राच्या अध्यक्षपदी मविप्रचे सभापती अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह अॅड. सुधीर कोतवाल व अॅड. नवनाथ गोरवाडकर यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान वापरण्यासंबंधीच्या कायद्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे घडणारे सायबर गुन्हे याविषयी माहिती दिली. तसेच सायबर गुन्हे व इतर प्रकारचे गुन्हे यात फार मोठी तफावत समजावून सांगतानाच अशा गुन्ह्यांमध्ये व्यक्तीच्या मालमत्तेस तसेच प्रतिमेस होणारी हानी याविषयीही माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर अहेर, आयोजक समितीचे सदस्य प्रा. प्रशांत बनकर, प्रा. प्रशांत कदम, प्रा. मदन हळदे, प्रा. अमित मोगल, प्रा. उदय चौधरी, प्रा. एस. एस. कुलकर्णी, प्रा. ए. एस. बच्छाव, प्रा. एस. व्ही. श्रीमाळी, प्रा. व्ही. टी. धोकरट आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रशांत निकम यांनी केले. (प्रतिनिधी)
संगणक युगात नेटीकेट््सची गरज
By admin | Updated: February 5, 2017 22:44 IST