नाशिक : विवाहसंस्था ही समाजाचे प्रमुख अंग असून, ते टिकविण्यासाठी पती-पत्नीने आपल्यातील अहंपणा दूर ठेवावा, तसेच कौटुंबिक खटले चालविणाऱ्या वकिलांनीही व्यावसायिकतेऐवजी नैतिक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे़ पती-पत्नीच्या एकत्रित राहण्यामध्येच मुलांचे हित असून, आपसातील प्रेम, जिव्हाळ्यामुळे मुलांमध्ये चांगले संस्कार होऊन कुटुंबव्यवस्था टिकण्यास मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर यांनी केले़ नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या़नाशिक बार असोसिएशनतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविता ठाकूर होत्या़ पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पती-पत्नी यांच्यामधील अहंपणा हा संसार मोडण्यामध्ये बहुतेक प्रकरणांमध्ये कारणीभूत ठरल्याचे दिसून येते़ त्यामुळे कुटुंब, समाज तसेच देशहितासाठी कुटुंबव्यवस्था टिकणे गरजेचे आहे़ कौटुंबिक न्यायालयाचा हा वर्धापनदिन सोहळा नसून ऋणनिर्देश सोहळा असल्याचे ठाकूर यांनी सांगितले़ पोलीस उपआयुक्त एन. अंबिका यांनी पती-पत्नीमधील नाते जोपासण्याची आवश्यकता असल्याचे सांगून सासरी आलेल्या नवविवाहितेला समजून घेण्याची आवश्यकता आहे़ तसेच महिला कायद्याचा दुरुपयोग योग्य नसून जनजागृती गरजेची असल्याचे अंबिका म्हणाल्या़ असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ नितीन ठाकरे यांनी या न्यायालयाच्या उद्देश सफल झाल्याचे सांगितले़ यावेळी व्यासपीठावर अॅड़ मंगला शेजवळ, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही़ आऱ अगरवाल, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आदि मान्यवर उपस्थित होते़ आपसातील वाद तडजोडीने मिटविणाऱ्या तीन जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला़ यावेळी अॅड़ प्रेमनाथ पवार, अॅड़ धर्मेंद्र चव्हाण, अॅड़ शिरीष पाटील, अॅड़ बाळासाहेब आडके, अॅड़ सुरेश निफाडे, अॅड़ अपर्णा पाटील, अॅड़ हेमंत गायकवाड यांच्यासह वकील व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.जालिंदर ताडगे यांनी केले़ अॅड़ संजय गिते यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)
कुटुंबव्यवस्थेसाठी अहंकार दूर ठेवण्याची गरज
By admin | Updated: October 27, 2015 22:37 IST