नाशिक : राष्ट्रवादीला सत्तेचा आणि पैशांचा माज चढला असून, त्यांना आता मनसेची भीती वाटू लागल्याने तासगावमध्ये मनसेच्या उमेदवारावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्यात आले आहे. उलट या राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर कमी बलात्कार केले आहेत काय, असा संतापजनक सवाल करत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढविला. ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्ष गाडावाच लागेल, असे सांगतानाच नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीने स्वत:हून बिनशर्त पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरणही दिले. सिडकोतील राजे संभाजी स्टेडिअममध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार नितीन भोसले, गंगापूररोडवरील शिवसत्य मैदानात नाशिक मध्यचे उमेदवार वसंत गिते आणि नाशिकरोडला नाशिक पूर्वचे उमेदवार रमेश धोंगडे व देवळालीचे उमेदवार प्रताप मेहरोलिया यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या.४नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीकडून मिळालेल्या पाठिंब्याबाबतचा खुलासा करताना राज ठाकरे यांनी सांगितले, भाजपावाल्यांना महापौरपद हवे होते. मुळात त्यांना माझ्याबरोबर यायचं नव्हतं आणि मलाही त्यांना घ्यायचं नव्हतं. नाशिकमधूनच मला आमच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे फोन आले की राष्ट्रवादी पाठिंबा द्यायला तयार आहे. परंतु मी त्यांना कोणतेही पद मिळणार नाही, बाहेरून पाठिंबा द्यायचा तर द्या, असे स्पष्ट केले. राज ठाकरे सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही. नजर खाली करून काम करायची मला सवयच नाही, असे सांगत ठाकरे यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले.