नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठात युनिस्को बायोइथिक्स अध्यासनाचे राष्ट्रीय मध्यवर्ती केंद्र होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली.वैद्यकीय अभ्यासक्रमात नैतिक शिक्षणाची आवश्यकता निर्माण झालेली आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये आरोग्य, वैद्यकीय गरजा, वैद्यकीय अचारसंहिता यांचा समावेश असलेल्या नैतिक शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आधुनिक अभ्यासक्रम तयार करून त्याबाबत आधुनिक ज्ञान, नीती व शिक्षण देण्याच्या उद्देशाने इस्त्राईल येथील हैफा विद्यापीठात २००१ मध्ये युनिस्कोने आशिया-पॅसिफीक बायोइथिक्स अध्यासन स्थापन केलेले आहे.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध ताणतणावाचे झालेले आहेत. डॉक्टरांना ही परिस्थिती हाताळता यावी, सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, आरोग्य संबंधित कायदे, नियमावली तसेच इतर कायदेशीर बाबींची माहिती, येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी एका अचारसंहितेची आवश्यकता असून, त्यातूनही ही संकल्पांना आकारास आल्याचेही जामकर यांनी सांगितले.युनिस्कोच्या आशिया-पॅसिफिक बायोइथिक्स नेटवर्क या आंतरराष्ट्रीय संस्थेने नीती शिक्षण, वैद्यकीय आचारसंहितेचे महत्त्व लक्षात घेऊन त्याबाबतचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राच्यामार्फत काम केले जाणार आहे. सदर संस्थेमार्फत नीती शिक्षणाबाबत विविध नियतकालिके, पुस्तके यांच्यामार्फत ज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य विद्यापीठात बायोइथिक्सचे राष्ट्रीय केंद्र
By admin | Updated: March 20, 2015 00:06 IST