नाशिक : अनेक दिवसांपासून अवकाळीचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता पावसापासून दिलासा मिळाला असला, तरी काही दिवसांपासून सुरू झालेल्या उकाड्यामुळे नाशिककर हैरान झाले आहेत. दुपारच्या वेळी लागणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे रस्ते सुनसान होत आहेत. नाशिकच्या तपमानाने चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या ५ दिवसांत ज्या वेगाने तपमानात वाढ झाली ते पाहिले तर या महिनाअखेरीस तपमान चाळिशी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उन्हाळा लागल्यानंतरही दर पंधरा दिवसांत हजेरी लावणाऱ्या अवकाळीमुळे वातावरणातील विषमता निर्माण झाली होती. तपमानही ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यानच होते. त्यातच स्वाइन फ्लू आजारानेही डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीही निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत मागील आठवड्यापर्यंत असलेल्या ढगाळ वातावरणाने पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यादरम्यान पावसाने शहरात केवळ हजेरीच लावल्याने त्यानंतर सुरू झालेल्या तपमानवाढीत सातत्य राहिल्याने मार्च अखेरीस पाऱ्याने चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. शनिवारपासून ३८ अंशांवर पोहोचलेल्या पाऱ्याने खऱ्या अर्थाने वैशाख वणवा काय असतो हे दाखवून दिले. पाच दिवसांत तपमानाचा पारा २३ पासून थेट ३८ वर पोहोचला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कमी-जास्त झालेला पारा पाहिला तर येत्या काही दिवसांत पारा ४०च्या पार जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. दुपारच्या वेळेस वाढलेल्या उष्म्यामुळे गजबजलेले रस्तेही त्यामुळे दुपारच्या वेळेस निर्मनुष्य झाले होते. जे काही मोजके नागरिक बाहेर पडलेले दिसत होते त्यांनीही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, गॉगल आणि पंचा यांचा आधार घेतला होता. शीतपेये आणि रसवंतीगृहावर नागरिकांची गर्दी दिसू आली. बर्फाच्या गोळ्याची चव चाखण्यासाठीही लहान मुलांनी हजेरी लावली. (प्रतिनिधी)
नाशिकच्या तपमानाने चाळिशीकडे वाटचाल
By admin | Updated: April 20, 2015 01:31 IST