सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या गुही, मांदा, मोरचोंड येथून चौघा संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच वलसाड जिल्ह्यातून चार असे एकूण आठ संशयित आरोपी या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी गजाआड केले आहेत. दरम्यान, वलसाडचे पोलीस अधीक्षक राजदीपसिंह झाला आणि नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे एकमेकांच्या सतत संपर्कात असून, वलसाड, धरमपूर पोलिसांना आवश्यक ती सर्व मदत बनावट नोटांच्या गुन्ह्याच्या तपासासाठी सुरगाणा पोलिसांकडून केली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. सुरगाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वलसाड वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपापसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बनावट नोटांप्रकरणी धरमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला आहे.
--इन्फो--
सराईत गुन्हेगारासह सेतूचालक सहभागी
बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रताप करणाऱ्यांमध्ये सुरगाण्यातील संशयित सराईत गुन्हेगार हरिदास चौधरी याच्यासोबत उंबरठाण येथे सेतू कार्यालय चालविणारा संशयित अनिल बोचल हादेखील सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. चौधरीविरुद्ध यापूर्वी सुरगाणा, धरमपूर, सापुतारा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. संशयित जयसिंग वळवी, भगवंत डंबाळे यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
--इन्फो--
सीमावर्ती भागात बनावट नोटांची ‘चलती’
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागातील आदिवासी गाव, पाड्यांवर चालणारे अवैध जुगार, मद्यविक्रीचे अड्डे तसेच गाव, पाड्यांवर भरणारे आठवडे बाजारांमध्ये मोठ्या चलाखीने बनावट नोटा टोळीकडून चलनात आणल्या गेल्याचा पोलिसांना संशय आहे. यादृष्टीने सुरगाणा, वलसाड, धरमपूर पोलीस आपापल्या हद्दीत संशयित ठिकाणांवर छापेमारी करत गोपनीय माहितीद्वारे बनावट नोटांचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.