नाशिक : नाशिकच्या नूतन पोलीस आयुक्तपदी राज्य मानवी हक्क आयोगाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. जगन्नाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधीमंडळ अधिवेशनात सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात पोलीस दलामार्फत उभारण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात नाशिक पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने त्याबाबत चर्चेला उधान आले असून, नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्तीचे आदेश प्राप्त होताच, स्थानिक पोलिसांनी फटाके वाजवून त्याचे जोरदार स्वागत केले आहे. तीन वर्षांपूर्वी बदलून आलेल्या पोलीस आयुक्तांनी प्रारंभीच्या काळात आॅलआउट, गुन्हेगार शोधमोहीम यासारखे उपक्रम राबवून गुंड, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु ती आरंभशुरताच ठरली. खून, दरोडे, बलात्कारासारखे गंभीर गुन्'ात वाढ होण्याबरोबरच सोनसाखळी चोरांनी मांडलेल्या उच्छादामुळे व जागोजागी सर्रास सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे समस्त पोलीस दलाला मानहानी पत्करावी लागली, परिणामी शहरात पोलीस राजऐवजी गुंडाराज सुरू झाले. या सर्व पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात पोलीस यंत्रणेचा मोठा वाटा असताना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्याविषयी व्यक्त केलेली नाराजी पाहता, नाशिक पोलीस आयुक्तालयात खांदेपालटाचे संकेत यापूर्वीच मिळाले होते, परंतु कुंभमेळ्याच्या कामांच्या निविदा व कंत्राट देण्याच्या कामात खोळंबा होऊ नये म्हणून खांदेपालट रोखण्यात आले होते. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर झडलेली चर्चा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निविदेचा चाललेला घोळ या सर्व घटना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांना तडकाफडकी बदलीचे आदेश काढावे लागले आहेत. गुरुवारी दुपारी याबाबतचे अधिकृत वृत्त पोलीस दलात वाऱ्यासारखे पसरताच, नूतन पोलीस आयुक्तांच्या स्वागतासाठी काही पोलीस ठाण्यांच्या बाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी नूतन पोलीस आयुक्त के. जगन्नाथन हे पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी दरम्यान काही काळ के. जगन्नाथन यांनी नाशिक पोलीस उप आयुक्त म्हणून काहीकाळ काम केले आहे.
नाशिक पोलीस आयुक्तपदी के. जगन्नाथन
By admin | Updated: April 3, 2015 01:12 IST