नाशिक : तालुका पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध होऊन पंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रत्नाकर चुंबळे, तर उपसभापती कविता बेंडकोळी यांची निवड झाली. त्र्यंबकेश्वर रोडवरील नाशिक तालुका पंचायत समितीच्या इमारतीत ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सभापती व उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. गेल्या पाच दिवसांपासून सहलीला गेलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पाच सदस्य मंगळवारी (दि.१४) सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर पंचायत समिती सभापतिपदासाठी रत्नाकर चुंबळे यांनी तर उपसभापतिपदासाठी कविता बेंडकोळी यांनी अर्ज दाखल केला. दुपारी एक वाजेपर्यंत सभापतिपदासाठी रत्नाकर चुंबळे यांचा तर उपसभापतिपदासाठी कविता बेंडकोळी यांचा एकेक अर्ज आल्याने सभापतिपदी रत्नाकर चुंबळे, तर उपसभापतिपदी कविता बेंडकोळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, रायुकॉँ जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, अपर्णा खोसकर, पंचायत समिती सदस्य छाया डंबाळे, ढवळू फसाळे, विजया कांडेकर, विजय जगताप, माजी सभापती दिलीप थेटे, मंदाबाई निकम, माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे, कल्पना चुंबळे, नामदेव गायकर, भाऊसाहेब खांडबहाले, दीपक वाघ, लक्ष्मण मंडाले, मनोहर बोराडे, पी. के. जाधव, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी स्मिता गुजराथी आदि उपस्थित होेते. निवडणुकीनंतर रत्नाकर चुंबळेंच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)
नाशिक पंचायत समिती : बिनविरोध झाली निवडसभापतिपदी चुंबळे; उपसभापति बेंडकोळी
By admin | Updated: March 15, 2017 01:19 IST