नाशिक : मोठा पौराणिक-धार्मिक वारसा असलेल्या नाशिकसारख्या शहरावर पुस्तक लिहिणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे; मात्र ठाकूर भरतसिंह यांनी हे शिवधनुष्य आपल्या कौशल्याने लिलया पेलले व ‘नाशिक युगों-युगों की साक्षी नगरी’ हा शोधग्रंथ लिहिला, असे प्रतिपादन डॉ. दिनेश सिंह यांनी केले.नाशिकच्या पौराणिक इतिहासापासून, तर विकासाच्या दिशेने ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या वर्तमानस्थितीचा आढावा ‘नाशिक युगों-युगों की साक्षी नगरी’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे. परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सिंह प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, इतिहासाचे लेखन करणे हे अत्यंत जटिल कार्य आहे. एखाद्या शहरातील ऐतिहासिक ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील वास्तव जाणून परखून घेतल्यानंतर लिहिलेला इतिहास हा नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. ‘नाशिक युगों-युगों की साक्षी नगरी’ हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे. कारण यासाठी ठाकूर यांनी संपूर्ण शहर पिंजून काढत महत्त्वाची ठिकाणे व त्यांची वास्तववादी माहिती संकलित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर श्री ज्ञानानंद सरस्वतीजी महाराज, ज्ञानेंद्र महाराज, उद्योजक किसनलाल सारडा, दिग्विजय कापडिया, नेमिचंद पोद्दार, नरेंद्र ठक्कर, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आदि मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘नाशिक युगों-युगों की साक्षी नगरी’ शोधग्रंथ
By admin | Updated: August 9, 2015 00:02 IST