नाशिक : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणात नाशिक विभागात नाशिक जिल्हा तृतीय स्थानावर पाेहाेचला आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या धुळे जिल्ह्याने तर लक्ष्य पूर्ण करीत १०८.७५ टक्के इतकी कामगिरी बजावली आहे.
लसीकरणामध्ये प्रारंभापासूनच नाशिक जिल्हा काहीसा पिछाडीवर पडला असल्याचे दिसून येते. त्यात शनिवारी झालेल्या लसीकरणात धुळे जिल्ह्याला ४०० लसींचे लक्ष्य असताना त्यांनी ४३५ लसीकरण करीत ध्येयापेक्षा अधिक कामगिरी केली आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्याला ७०० लसींचे लक्ष्य असताना त्यांनी ६६४ म्हणजे ९४.८६ टक्के लक्ष्य साध्य केले. तृतीय क्रमांकावर नाशिक जिल्हा असून नाशिकला देण्यात आलेल्या १३०० लक्ष्यांकापैकी ११७१ एवढेच म्हणजे ९०.०८ टक्के कामगिरी पूर्ण केली आहे. तर नंदुरबार जिल्ह्याने ४०० पैकी ३०८ म्हणजे केवळ ७७ टक्के लक्ष्यपूर्ती करीत चौथे स्थान मिळवले. तर शेवटच्या स्थानावर नगर जिल्ह्याचा समावेश असून त्यांनी १२०० पैकी केवळ ८७० लसींचे लक्ष्य गाठल्याने ७२.५० टक्क्यांसह नगर जिल्हा पाचव्या स्थानी राहिला.