नाशिक : माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने पिंगळे यांची अखेरीस गच्छंती झाली. १८ पैकी १५ संचालकांनी पिंगळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मंगळवारी (दि. ११) बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत सकाळी ११ वाजता प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षेतखाली व बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. हात उंचावून मतदान घेण्यात आले.
पिंगळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात असून भाजपाचे शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखालील १५ संचालकांनी पिंगळे यांच्यावर ३ मार्चला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यामुळे राज्यात महायुती सत्तेत असताना नाशिमध्ये मात्र अजित पवार व भाजपा गट अविश्वास प्रस्तावामुळे आमनेसामने आला. बाजार समितीत मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कामकाज असल्याच्या आरोप करत पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या संचालकांनी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल केला होता. ज्या १५ संचालकांनी अविश्वास आणला त्यातील ११ संचालक मुळचे अजित पवार गटाचेच आहेत.