लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील पाथरे येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ काशीनाथ नरोडे व उपाध्यक्षपदी प्रवीण बाळासाहेब चिने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र भागवतराव घुमरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने नऊ जागा जिंकून बहुमत मिळविले होते. अशोक नरोडे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला चार जागा मिळाल्या होत्या. संस्थेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची शुक्रवारी सकाळी बैठक बोलावण्यात आली होती. निवडणूक अधिकारी गायकवाड यांना निवडणूककामी सचिव गुलाब चतुर व बाबासाहेब नरोडे यांनी साहाय्य केले. यावेळी संचालक गंगाधर सुडके, दशरथ मोकळ, लता बारहाते उपस्थित होते. बैठकीस नवनिर्वाचित विरोधी गटाचे संचालक अशोक नरोडे, प्रभाकर चिने, मच्छिंद्र चिने, शारदा दिघे गैरहजर होते. नवनिर्वाचित अध्यक्ष नवनाथ नरोडे व उपाध्यक्ष प्रवीण चिने यांचा राजेंद्र घुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब घुमरे, संदीप ढवण, रामनाथ शिवशंकर चिने, मोहन दवंगे, बाळासाहेब खळदकर, चांगदेव गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, हरिदास चिने, पप्पू गुंजाळ, भाऊसाहेब चिने, शिवाजी घुमरे, प्रमोद नरोडे, अशोक चंद्रे, विश्वनाथ चिने, सोपान चिने, ज्ञानदेव थोरात यांच्यासह ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.