रेल्वेस्थानकात वाढतेय गर्दी
नाशिक: अनलॉकच्या प्रक्रियेनंतर रेल्वेगाड्यादेखील सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये मागील दोन आठवड्यांपासून अनेक गाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे आता रेल्वेस्थानकात काही प्रमाणात गर्दी हेाऊ लागली आहे. गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी तसेच रेल्वेप्रवासासाठी स्थानकात प्रवासी दिसू लागले आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील गजबज वाढल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बागकाम प्रशिक्षण कामाला सुरुवात
नाशिक: काेरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेल्याने अनेकांना सध्या बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी नवचेतना स्वयंरोजगार सहायक समितीच्या वतीने बागकाम प्रशिक्षणाचे आयेाजन करण्यात आले आहे. रूंग्ठा हायस्कूल येथे सकाळी दहा वाजेपासून हे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यांना शिबारात लाभ घ्यायचा आहे त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पुरवणी परीक्षेसाठी समुदेशन सुरू
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समुदेशन केले जाणार आहे. पुरवणी परीक्षा सुरू असली तरी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून बोर्डाकडून समुपदेशन केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.