रामदास शिंदे, पेठ
हल्लीच्या विज्ञानयुगात भ्रमणध्वनीच्या गजराने सुरू होणारी पहाट पूर्वीच्या काळी वासुदेवाच्या टाळ चिपळ्याने व नंदीबैलाच्या गुबूगुबूने होत असे़ काळानुरूप या बाबी आता दुर्मीळ होत चालल्या असतानाच नंदीबैल घेऊन गावोगावी फिरणाऱ्यांनी तीन तीन पिढ्या या व्यवसायात खर्ची घातल्यानंतर त्यांची पुढची पिढी शिक्षणाकडे वळवली असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
सकाळच्या प्रहरी गावातील चौकाचौकात गुबूगुबूचा आवाज कानी पडताच घरातील बालगोपांळासह आबालवृद्धांची पावले अंगणी आलेल्या नंदीबैलाला पाहण्यासाठी आपसुकच वळायची़; मात्र काळाच्या ओघात सध्या नंदीबैल दिसेनासे झाले असून आधुनिकतेच्या जमान्यात नंदीबैल ही संस्कृतीच लोप पावत चालल्याचे दिसून येत आहे़ साधारणपणे खरीप हंगाम आल्यावर नंदीबैल गावात येत होते़ आपल्या धन्याच्या इशाऱ्यावर मान डोलावून नागरिकांचे भविष्य सांगणाऱ्या नंदीबैलावर जनतेची अपार श्रद्धा होती़ घरातील सुवासिनी सुपात धान्य आणून नंदीबैलाचे औक्षण करायच्या. त्याला धान्य खाऊ घालायच्या़ शिल्लक धान्य त्यांच्याच झुलीला शिवलेल्या खोळीत टाकीत नंदीबैलवाला कुळाचा उद्धार आणि सर्वांनाच चांगल्या आरोग्याची व भरभराटीची मागणी करायचा. पण हे चित्र आता दिसेनासे झाले आहे़ गावातील बालगोपाळ तर नंदीबैल गावात असेपर्यंत त्याच्या शेपटीला चिटकलेले दिसून येत़ ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय’ असे प्रश्न विचारल्यावर भोलानाथही अदबीने मान डोलावत प्रतिसाद देत असे़ सध्याच्या औद्योगिकीकरणाने विकसित झालेल्या समाजात नंदीबैलाचे दर्शनही दुर्मीळ झाले आहे़ शिवाय महागाईच्या जमान्यात नंदीबैलाच्या व्यवसायावर स्वत:सह कुटुंबाची गुजराण होत नसल्याने अनेकांनी परंपरागत चालू असलेल्या या व्यवसायाला मुठमाती दिली आहे़ पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य पिकत असल्याने नंदीबैल व त्याच्या मालकाकडे वर्षभर पुरेल इतके धान्य जमा होत असे़ आता तर जनतेलाच खरेदी करून धान्य वापरावे लागत असल्याने आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येईल अशी गत झाल्याने नंदीबैलवाल्यांचा व्यवसायही काळाच्या पडद्याआड गेला आहेत़नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शिवाजी घोडे हे आपल्या कुटुंबातील चार कर्त्या पुरुषांसह गत पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील गावोगाव भटकंती करीत ही परंपरा जपत आहेत़; मात्र वाढत्या शहरीकरणामुळे आता नंदीबैलाचे आकर्षण कमी होत चालले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ पूर्वजांचा पारंपरिक व्यवसाय म्हणून आम्ही यात पडलो मात्र आता आमच्या यापुढील पिढीला शिक्षणाकडे वळवले असल्याचेही घोडे सांगतात़ आजच्या माणसांकडे संपत्ती वाढली असली तरीही मने मात्र संकुचित होत असून नंदीबैलाचा व्यवसाय अडगळीत पडत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़''आमच्या तीन चार पिढ्यांपासून नंदीबैलाचा खेळ केला जात असताना आता आमची मुले शाळा शिकू म्हणतात. पण त्यांना शासनाच्या कोणत्याच सुविधांचा लाभ मिळत नाही़ कायम भटकंती असल्यामुळे आमच्या जमातीला शासकीय सवलती मिळत नसल्याने शासनाने आमच्या मुलांना शिक्षणात व नोकरीत आरक्षण द्यावे. - शिवाजी घोडे, नंदीबैल मालक