त्र्यंबकेश्वर : आचारसंहितेचा बागुलबुवा करून प्रशासनाने सिंहस्थ निधी अडविला, वास्तविक सिंहस्थपूर्व विकासकामांची निकड, वेळेचे बंधन पाहता सिंहस्थ कामे यापूर्वीच सुरू करावयास हवी होती. असा सूर त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांकडून ऐकायला येत आहे. डिसेंबर-जानेवारीमधील मंजूर झालेली कामे व अनुदान फेब्रुवारीमध्येच मंजूर झाल्याने निधी त्या-त्या यंत्रणेकडे रिलीज करणे गरजेचे असल्याने कामांची बर्यापैकी प्रगती झाली असती अशीही चर्चा शहरात होत आहे.सन २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किमान २०१५ मधील मार्च पावेतो कामे पूर्ण होणे. अपेक्षित आहे. सध्या मे महिना अर्ध्यावर आला आहे. त्यानंतर जून ते सप्टेंबर तर कधी ऑक्टोबर-नोव्हेंबर पावेतो पावसाळा असल्याचा अनुभव येत आहे. ऋतुचक्रात बदल झाल्याने हे असे घडत आहे. त्या-त्या कामांचा दर्जा कसा असेल हाही संशोधनाचा विषय ठरावा. शहरातील रस्ते खोदून त्यावरील सीमेंटचे थर काढून नव्याने काँक्रीटीकरण करायचे आहे त्यातही भूमिगत विद्युत वाहिनी भूमिगत टेलिकॉम ओएफसी टाकल्याशिवाय रस्त्यांची कामे करणे अशक्य आहे. शाही मार्गाचे रस्ते अगोदर करणे, वाहनतळ विकसनशेड बांधकामे करावयाचे आहेत. पण यापूर्वी बांधलेले शेडस्चा वापर काय? ते कोणाच्या ताब्यात आहेत. याचाही शोध पालिकेने घ्यावा. शौचालय बांधकाम करावयाचे आहेत. पण यापूर्वी बांधण्यात काही शौचालयांचा अद्याप वापर नाही हा खर्च वाया जात आहे. याबाबतही पालिकेला सर्व ज्ञात आहे. याशिवाय कोचुर्ली घनकचरा व्यवस्थापनाचे काम सिंहस्थापूर्वीच कार्यान्वित होणे जरुरीच आहे. गौतमी-गोदावरीचे थेट जलवाहिनीचे कामही मुदतीपूर्वीच पूर्ण व्हावयास हवे. ही सर्व कामे सिंहस्थापूर्वी कशी पूर्ण होतील हाही प्रश्न आहे. (वार्ताहर)
आचारसंहितेच्या नावाखाली सिंहस्थ निधी अडकला! त्र्यंबकेश्वरवासीयांची नाराजी
By admin | Updated: May 14, 2014 00:34 IST