सचिन सांगळे, नांदूरशिंगोटे (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारातील पांढरी वस्तीवर शुक्रवारी (दि.७) पहाटेच्या सुमारास बंगल्यात झोपलेल्या एकेचाळीस वर्षीय महिलेवर अचानक बिबट्याने हल्ला चढवल्याने जखमी झाली आहे.
नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बिबट्याने बंगल्यात प्रवेश करत महिलेवर हल्ला चढवला आहे. जखमी महिलेच्या हातावर व तोंडावर जखमा झाल्या आहेत. दरम्यान येथून जवळच असलेल्या दराडे मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या फस्त झाल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव जया राजेंद्र भालेराव (वय ४१) असे आहे.