नाशिक : बागलाण तालुक्यात शेत शिवारात राहणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याची तीन तरुणांनी कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २२) पहाटे कोटबेल येथील घुबडदरा शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी जायखेडा पोलिसांना एका संशयित आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी खुनाची सुपारी दिली असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
तालुक्यातील कोटबेल येथील सहादू रामचंद्र खैरनार (वय ७७) असे खून झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. सहादू खैरनार यांना मूलबाळ नसल्याने ते आपल्या पत्नीसमवेत कोटबेलच्या घुबडदरा शिवारात राहत होते. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पती-पत्नी झोपेत असताना दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. खैरनार यांच्या पत्नीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करून त्यांच्या तोंडात कापडाचे बोळे घातले. त्यानंतर सहादू खैरनार यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. वर्मी घाव लागल्याने खैरनार जागीच ठार झाले. खैरनार मृत झाल्याची खात्री करून तिघे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी खैरनार यांच्या घराकडे धाव घेतली असता सहादू खैरनार रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे आढळून आल्याने जमलेल्या शेतकऱ्यांनी पोलीस पाटील साहेबराव कांदळकर यांना घटनेची माहिती दिली. कांदळकर यांनीही कोणताही विलंब न लावता जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना माहिती दिल्याने तपासाची चक्रे शीघ्र गतीने फिरून संपूर्ण परिसर पिंजून काढत एकाला पकडण्यात यश आले, तर दोघे मात्र पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाले.
इन्फो
पूर्ववैमनस्यातून घटना?
संशयित आरोपी अवघ्या वीस वर्षांचा असून, पंकज चौधरी असे त्याचे नाव आहे. तो धुळे जिल्ह्यातील नेर येथील रहिवासी असून, त्याचे अन्य साथीदार देखील त्याच वयोगटातील असल्याची माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायंकाळी उशिरा मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, खैरनार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतजमीन विक्री केली होती. व्यवहार देखील पूर्ण झालेला नव्हता. हल्लेखोरांनी पैशांची कोणतीही मागणी न केल्याने या खुनामागे पूर्ववैमनस्य असल्याचे बोलले जात आहे.