नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानंतर महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी सुरू केलेल्या ‘ढोल बजाओ’ मोहिमेची थकबाकीदारांना चांगलीच दहशत बसली असून, पंधरा दिवसांत त्यामुळे महापालिकेच्या खजिन्यात तब्बल ८ कोटी रुपये जमा होऊ शकले आहेत.महापालिकेने चालू आर्थिक वर्षाअखेर घरपट्टी व पाणीपट्टीचे वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी परिणामकारक मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेचे पथक थकबाकीदारांच्या घर अथवा दुकानांपुढे जाऊन ढोल वाजविण्याचा कार्यक्रम राबवित आहे. महापालिकेने २ मार्चपासून सदर मोहिमेस सुरुवात केली. त्यानुसार, पंधरा दिवसांत महापालिकेच्या खजिन्यात तब्बल ८ कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिकेने घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ११५ कोटी रुपये ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत ७६ कोटी रुपये वसुली झाली आहे. पंधरा दिवसांत घरपट्टीच्या माध्यमातून ५ कोटी २५ लाख रुपये जमा झाले आहेत. याशिवाय महापालिकेने अनेक मिळकतीही जप्त करत त्यांना सील ठोकण्याची कारवाई केली आहे. मिळकतकराबरोबरच महापालिकेने पाणीपट्टी वसुलीचाही वेग वाढविला आहे. चालू आर्थिक वर्षात महापालिकेने ४० कोटी २६ लाख रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत २३ कोटी ७१ लाख रुपये जमा झाले आहेत. पंधरा दिवसांत पाणीपट्टीच्या माध्यमातून २ कोटी ४२ लाख रुपये जमा झाले असून, थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्याचीही मोहीम राबविली जात असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
महापालिका : ‘ढोल बजाओ’ मोहिमेस प्रतिसाद
By admin | Updated: March 16, 2017 23:56 IST