नाशिक : डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचीही योजना महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने आखली आहे. महापौर आणि आयुक्तांच्या निर्णयानंतर या योजनेला मूर्तस्वरूप येणार आहे. सध्या शहरात डेंग्यूच्या आजाराचे संशयित रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल होत असून, महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत उपाययोजना राबविल्या जात आहेत. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत महापालिकेत साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. सध्या विविध रुग्णालयांमध्ये संशयित आणि बाधित असे दोन प्रकारचे रुग्ण दाखल होताना दिसतात. परंतु संशयित रुग्णालाच बाधित समजले जात असल्याने गोंधळ उडतो. वातावरणातील जंतू संसर्गामुळे प्लेटलेट्स कमी होत जातात. परंतु त्यामुळे डेंग्यू झाल्याचे सांगितले जाते. एनएस-१ पॉझिटिव्ह म्हणजे डेंग्यू नव्हे. डेंग्यूविषयक रक्त नमुन्यांची तपासणी केवळ जिल्हा रुग्णालयात होत असते.
महापालिकेतही साथरोग नियंत्रण कक्ष स्थापणार
By admin | Updated: July 24, 2015 00:19 IST