नाशिक - मुख्य बाजारपेठ, शाळा, रिक्षा थांबे तसेच अन्य अनेक कारणांमुळे रविवार कारंजा येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटीने केवळ सर्वे सुरू केला तरी त्यावर उलटसुलट चर्चा सुरू हेाऊन विरोध केला जात आहे. मात्र, येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्थायी स्वरूपात प्रयत्न करण्यासाठी यशवंत मंडईचे पाडकाम करून त्याठिकाणी पाच मजली वाहनतळ उभा करून तेथे सुमारे साडे तीनशे वाहनांच्या पार्किगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. रविवार कारंजा परिसरातील एकूणच निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी गावठाण विकास प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी कंपनीने प्रस्ताव तयार करण्याची तयारी केली आहे. वाहतूक बेटाचा आकार देखील कमी अधिक करण्यात येणार आहे. सध्या वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी बेटाच्या भोवती वाळूच्या गोण्या टाकून सात दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र, उपाययेाजना सोडाच परंतु सर्वेक्षणासही परिसरातील व्यापारी व स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. यासंदर्भात व्यापाऱ्यांनी बुधवारी (दि. १५) स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांची भेट घेतली. रविवार कारंजावर नवा प्रयोग करण्याऐवजी आधी वाहनतळाची उभारणी आवश्यक असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफु्ल्ल संचेती यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र सर्वेक्षणाअंती निघणाऱ्या निघणाऱ्या निष्कर्षासंदर्भात
स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांशी चर्चा केल्यानंतर कायमस्वरुपी उपाययोजनांवर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सुमंत मोरे यांनी व्यापाऱ्यांना दिले.दरम्यान, यशवंत मंडईच्या जागेवर खासगीकरणातून वाहनतळ साकारण्याचा प्रस्ताव गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेला आहे, आता स्मार्ट सिटी कंपनीने त्याचा आराखडा तयार केला असून या कामाच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहे,असेही मोरे यांनी सांगितले.
इन्फो...
स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने यापूर्वी देान वेळा बीओटीतून यशवंत मंडईचा विकास करण्याची योजना आखली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आता दहा कोटी रुपये खर्च करून बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून
पाच मजली वाहनतळास अंदाजे १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मंडईचे पुनर्निर्माण करताताना त्यात दुकाने बांधले जातील.आणि ती सध्या मंडईतील गाळेधारकांना देण्याचा प्रस्ताव आहे. तळघरात दुचाकी वाहनांसाठी तर चौथा आणि पाचवा मजला चारचाकींसाठी वाहनतळ म्हणून ठेवण्यात येणार आहे. तळघरात किमान १५० दुचाकी उभ्या करता येतील. तर चारचाकींसाठीच्या वाहनतळात शंभर मोटारी उभ्या राहू शकतील. असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.