बाजारपेठा खुल्या झाल्याने दिलासा
नाशिक : निर्बंध शिथिल झाल्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. यामुळे अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. विशेषत: यामुळे शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे खते यांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. बंदमुळे अनेकांना मेणकापड मिळणे मुश्कील झाले होते. त्यामुळे अनेकांचा शेतीमाल पावसात भिजला.
छोट्या व्यावसायिकांना रोजगार
नाशिक : शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे शहरातील छोट्यामोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता व्यवसाय सुरू झाल्याने किमान रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रुग्णसंख्या कमी झाल्याने समाधान
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. रुग्णसंख्या वाढत असताना या कर्मचाऱ्यांना साधी साप्ताहिक सुट्टी घेणेही जिकिरीचे झाले होते. याशिवाय अतिकामाचा ताणही त्यांच्यावर आल्यानेही अनेकांना थकवा जाणवत होता. अनेक कर्मचाऱ्यांना सलग ड्युटी करावी लागली.
काही भागात अद्याप टँकरने पाणी
नाशिक : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडला असला तरी अद्याप अनेक गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मे महिन्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या. आदिवासी भागात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. काही ठिकाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता, तो अद्याप कायम आहे.
उद्यानांची स्वच्छता करण्याची मागणी
नाशिक : मागील दीड वर्षांपासून शहरातील उद्याने बंद असल्यामुळे काही ठिकाणी झाडांचा पालापाचोळा पडून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. अनेक उद्यानांमध्ये वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्याने कचरा साचला आहे. उद्यानांची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.