नाशिक : म्युकरमायकोसिस रुग्ण आढळून येण्याच्या प्रकारात गत महिन्यात अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली होती. मात्र, ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा सातत्याने तुटवडा घातक ठरत असल्याने जिल्ह्यातील १० हून अधिक नागरिकांना त्यातून डोळे गमवावे लागले आहेत.
म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येने, तसेच त्यावर आवश्यक असणाऱ्या ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ज्या रुग्णांच्या डोळ्यामागील पटलाला काळी बुरशीने ग्रासले, अशा अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेचा सामना करावा लागला. त्यातील काहींच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी १० हून अधिक नागरिकांना किमान एक डोळा गमवावा लागला आहे. काही रुग्णांना तर एकदा ऑपरेशन केल्यानंतर पुरेशा प्रमाणात ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन न मिळाल्याने पुन्हा ऑपरेशन करण्याची वेळ आली. त्यामुळे उपचाराचा खर्च दुपटीने वाढला असल्यानेदेखील म्युकरमायकोसिसग्रस्तांचे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसिस हे कोरोनानंतर उद्भवणारे संकट हे कोरोनापेक्षाही भयप्रद आणि प्रचंड खर्चिक, तसेच मोठ्या प्रमाणात जीवघेणे ठरू लागले आहे.
इन्फो
उपचार खर्च आवाक्याबाहेर
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नाशिकचे जिल्हा रुग्णालय, मालेगावचे शासकीय रुग्णालय, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, एसएमबीटी रुग्णालय यासह नामको हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल आणि वाेक्हार्ट हॉस्पिटल या दवाखान्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन्स पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने एकाच रुग्णावर पुन्हा ऑपरेशन करण्याची वेळ येण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करणे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे ठरू लागले आहे.
इन्फो
इंजेक्शनचा तुटवडा ठरतोय घातक
प्रत्येक रुग्णास दररोज किमान आठ इंजेक्शन याप्रमाणे १०० इंजेक्शन लागतात. ज्यांची अधिकृत किंमतच प्रतिइंजेक्शन साडेपाच ते साडेसात हजार असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा केवळ इंजेक्शन्सचा खर्चच सात लाखांवर जातो. अशा परिस्थितीत सामान्य रुग्णांना हा खर्च परवडणारा नाही. त्यात केवळ एकदा ऑपरेशन केल्यानंतरही जर पुरेशा प्रमाणात इंजेक्शन्स मिळाले नाहीत, तर अनेक रुग्णांवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ऑपरेशनच्या या दुहेरी खर्चाने, तसेच हॉस्पिटल्समध्ये राहण्याचा कालावधी इंजेक्शन्सअभावी लांबत असल्याने म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांचे कुटुंबीय त्रस्त झाली आहेत. सध्यादेखील जिल्ह्यात असलेल्या सुमारे तीनशे म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांना दिवसाला केवळ प्रत्येकी १ किंवा २ इंजेक्शनच मिळत असल्याने म्युकरमायकोसिसचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अत्यल्प होऊ लागले असून, म्युकरमायकोसिसग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण १७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
इन्फो
सुरुवातीला नाकातील सायनसजवळ म्हणजेच साधारणपणे गालांखाली हा आजार होतो. नाकापासून डोळ्यांपर्यंत आणि तिथून मेंदूपर्यंत जाणारा हा आजार आहे. याशिवाय, हा आजार फुप्फुसाला होऊ शकतो. पोट आणि आतड्यांनाही होऊ शकतो. त्वचेला, इतकेच नाही, तर शरीरात अन्य कोठेही पसरू शकतो. म्युकरमायकोसिसचे चार टप्पे आहेत. अवघ्या- या पाच दिवसांत रुग्ण एकेक टप्पा ओलांडत पुढच्या टप्प्यात म्हणजेच अति जोखमीत पोहोचतो. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत हा आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचतो. पहिले ७२ तास म्हणजे तीन दिवसांत हा आजार औषधांवर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. बुरशी शरीरात पसरत जाऊ नये, यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
इन्फो
म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीस काही काळाने नाकातील खपलीने या आजाराची सुरुवात होते. खपली होताच तज्ज्ञांकडून वेळेत तपासून घेतले, तर आजाराला तेथेच अटकाव करता येतो. कोविडमुळे शरीराच्या ज्या पेशी मरतात, त्यातून आयर्न बाहेर पडते. हे या आजारातील बुरशीचे प्रमुख खाद्य असते. डोळे, नाकाभोवती गालांखालील भागात सूज, तसेच चेहऱ्यावर अन्यत्र सूज, नाकातून रक्त येणे, गाल व टाळूला बधिरता येणे, दात ढिले पडणे, डोके दुखणे ही या आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत.
कोट
दुसऱ्या टप्प्यापर्यंत कान, नाक, घसातज्ज्ञ रुग्णावर शस्त्रक्रिया करू शकतात. त्यानंतरही डोळ्यापर्यंत बुरशी पोहोचली, तर नेत्रविकारतज्ज्ञांना ऑपरेशन करून बुरशी काढणे शक्य असल्यास बुरशी काढणे किंवा थेट डोळा काढण्याचीदेखील वेळ येते. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापश्चातही सावध राहून काही लक्षणे आढळल्यास त्वरित संपर्क साधणे आवश्यक आहे.
-डॉ. शरद पाटील, नेत्रविकारतज्ज्ञ