सटाणा (नितीन बोरसे) : जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्यामुळे बागलाणमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. बागलाण तालुक्यात एकूण सात जिल्हा परिषद गट आहेत. भाजपच्या ताब्यात चार व अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडे प्रत्येकी एक गट आहे. प्रत्येक सदस्याने आपल्या गटात कामे खेचून आणून आपला वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बळावरच आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी गटाचे संभाव्य आरक्षण कसे राहील, त्या दृष्टीने आडाखे बांधून इच्छुकांनी चाचपणी सुरू केल्याने राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र बागलाणमध्ये बघायला मिळत आहे.
बागलाण हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांचा कस लागत असतो. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे त्यावर डोळा ठेवून ब्राम्हणगाव, ठेंगोडा या दोन गटांमध्ये मातब्बर उमेदवारांमध्ये चुरस बघायला मिळाली. सध्या ठेंगोडा गटाचे प्रतिनिधित्व भाजपच्या मीना मोरे करत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपच्या मोरे यांच्यासह ऐनवेळी काँग्रेसने तिकीट कापल्याने माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील यांनी राष्ट्रवादीचा मार्ग पकडून उमेदवारी केली. तर विरगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी पत्नी सारिका यांना काँग्रेसची उमेदवारी पदरात पाडून संगीता पाटील यांना धक्का दिला. या दोन्ही मराठ्यांच्या लढाईत मात्र ओबीसी मोरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. मोरे यांनी गेल्या साडेचार वर्षांत दुर्लक्षित रस्ते, शाळा इमारत उभारण्यासाठी प्रयत्न केले.
ब्राम्हणगाव गटात गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला उमेदवारच न मिळाल्याने शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्छाव यांच्या पत्नी वर्षा व भाजपच्या लता बच्छाव यांच्यात सरळ लढत झाली. भाजपला राष्ट्रवादीची छुपी मदत मिळाल्याने लता बच्छाव काठावर पास झाल्या. जायखेडा गटात गेल्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी उड्या घेतल्याने सुरुवातीला चुरशीची होणारी निवडणूक शेवटच्या चरणात एकतर्फी झाली. राष्ट्रवादीचे यतीन पगार यांनी भाजपचे डॉ. सी. एन. पाटील, ऐनवेळी काँग्रेसच्या तिकिटावर नशीब अजमावणाऱ्या मनीषा भामरे, सेनेच्या देवरेंना धोबीपछाड दिली. यतीन पगार यांनी आपल्या कार्यकाळात नालेजोड प्रकल्प, साखळी बंधारे, करंजाडी नदीवर बंधारे बांधून नदी बारमाही करण्याचा प्रयत्न केला. या भरीव कामांमुळे पगारांचा सर्वत्र बोलबाला आहे. पठावे दिगर गट गेल्यावेळी खुला असल्यामुळे डांगसौंदाणे येथील तुळजाभवानी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन निवडणूक रिंगणात उतरले तर माजी आमदार लहानू अहिरे यांचे सुपुत्र गणेश यांनी आदिवासी समाज एकत्र आणून अपक्ष उमेदवारी करून सोनवणे यांच्यासमोर आव्हान उभे केले. आदिवासी एकवटल्याने अहिरे यांच्या गळ्यात अलगदपणे विजयाची माळ पडली. विरगाव गटात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उपरा उमेदवार देऊन पायावर धोंडा पाडून घेतला. वीरेश घोडे यांची पत्नी वंदना यांचे तिकीट कापून देवळा तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्या उषा बच्छाव यांना उमेदवारी दिली. घोडे यांनी बंडखोरी केल्यामुळे कोळी समाजाच्या मतांची विभागणी होऊन भाजपच्या साधना गवळी यांना लॉटरी लागली. ताहाराबाद गटात इंदुबाई यशवंत अहिरे (शिवसेना), शकुंतला पोपट गवळी (भाजप), संगीता साबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा यशवंत पवार (काँग्रेस) अशी चौरंगी लढत झाली. रेखा पवार यांनी आपल्या जनसंपर्काच्या जोरावर विजय खेचून आणला. नामपूर गटात गेल्या निवडणुकीत मनसेसह चार प्रमुख पक्षांनी रणशिंग फुंकले.
कान्हू गायकवाड (भाजप), सोमनाथ रावण सोनवणे (शिवसेना), नंदू सखाराम शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), शरद पवार (काँग्रेस), डॉ. राजाराम अहिरे (मनसे) या गटावर भाजपचे प्राबल्य असल्यामुळे कन्हू गायकवाड यांना मिनी मंत्रालयात जाण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. अशिक्षित असताना त्यांनी आपल्या परीने गटाचा विकास करण्याचा प्रयत्न केला.
-------------------
बागलाण विकास आघाडीची चर्चा....
जिल्हा परिषद गटातील संभाव्य आरक्षण सोडत बाकी असली तरी तालुक्यातील राजकारण सक्रिय असलेली एक फळी मात्र विकासाच्या दृष्टीने आघाडी स्थापन करून एक नवा प्रयोग करण्यासाठी चाचपणी करत आहे. मात्र कार्यकर्त्यांचे मोहळ, बूथ यंत्रणा हा सर्व विचार करून आघाडी तयार करण्यात कितपत यश येते हे काळच सांगेल. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने पेसा क्षेत्रातील गट कायमस्वरूपी अनुसूचित जमातीसाठी राखीव केल्याने अन्य गट खुले राहतील का, याबाबत सर्वत्र संभ्रम अवस्था असली तरी इच्छुकांनी मात्र आपल्या हक्काच्या गटासोबतच दुसऱ्या गटात कोणत्या पक्षाची चलती आहे. याची चाचपणी करून आपल्या हक्काची गावे त्या गटाला जोडून त्या पक्षाच्या उमेदवारीसाठी आजच प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ऐनवेळी भाजपात इन्कमिंग सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
------------------------
पक्षीय बलाबल भाजप - ४
काँग्रेस - १
राष्ट्रवादी - १
अपक्ष - १