पेठ : नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने नाकारलेली जुनी पेन्शन योजना सुरू करावी, या मागणीसाठी राज्यातील हजारो शिक्षकांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करून शासनालाच आव्हान केले आहे़‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ‘पेन्शन आमच्या हक्काची’, ‘पेन्शन, पेन्शन’च्या घोषणांनी दिवसभर मुंबईचे आझाद मैदान दणाणून सोडले होते़ यावेळी महाराष्ट्रातील पेन्शनपीडित कर्मचारी भर उन्हात ठाण मांडून बसले होते़दुपारच्या सत्रात मंत्रालयातून अनेक सत्ताधारी व विरोधी आमदारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला़ त्यात डॉ़ सुधीर तांबे, नरहरी झिरवाळ, शिक्षक आमदार कपिल यांच्यासह जवळपास १५ आमदारांनी भेटी दिल्या़, तर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन जुनी पेन्शन योजना मागणीवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले़ ज्या कर्मचाऱ्यांचा अंशदायी पेन्शन योजनेत असताना मृत्यू झाला अशा कर्मचाऱ्यांना तत्काळ जुने निवृत्तिवेतन लागू करून त्यांच्या कुटुंबीयांना आधार द्यावा, अशी मागणी करण्यात आली़ जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष रितेश खोडेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी दिवसभर आझाद मैदानावर बसून आंदोलन यशस्वी केल्याने आता शासनाला याची दखल घ्यावी लागेल, असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखवला़ (वार्ताहर)
जुनी पेन्शन संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 22:13 IST