नाशिक : कुंभमेळा अवघ्या आठ महिन्यांवर आला आहे. त्यामुळे आता सर्वाधिक भर कुंभमेळ्याशी संबंधित कामांनाच देण्यात येणार आहे, असे सांगतानाच महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नव्या करापेक्षा उपलब्ध कर आणि या करांची वसुली हा महत्त्वाचा पर्यांय असल्याची माहिती दिली.तब्बल आठ महिन्यांनी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त लाभले असून, त्यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुंभमेळ्याच्या कामांनाच सद्यस्थिती प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. कुंभमेळ्यासाठी निधीची गरज असून, त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्र सकारात्मक विचार करेल, असेही ते म्हणाले. सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असली तरी त्या स्थितीमध्ये सुधारणा करणे अशक्य नाही. राज्य शासनाने एलबीटी रद्द केला तरी त्याला पर्याय मिळेलच; परंतु महापालिकेचे घरपट्टी आणि पाणीपट्टीसारखे जे कर आहेत त्याची थकबाकी वसूल करण्यावर भर राहील, असेही ते म्हणाले. एकाच जागी वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतही त्यांनी अन्य शासकीय विभागांत कर्मचाऱ्यांची अन्य तालुक्यात बदली केली जाते तसे महापालिकेत होऊ शकत नाही. तथापि, प्रत्येक विभागाचे कामाचे स्वरूप वेगळे आहे. स्वत:च्या सोयीनेच कोणी एखाद्या विभागात ठाण मांडले असेल तर त्याची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल, असेही गेडाम म्हणाले. (प्रतिनिधी)
सर्वाधिक भर कुंभमेळ्याशी संबंधित कामांनाच देण्यात येणार
By admin | Updated: November 11, 2014 01:00 IST