पंचवटी : प्रभागात उद्भवणाऱ्या समस्या तसेच दुरुस्तीच्या कामांबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही दुरुस्ती कामे वेळेत होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. केवळ प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळेच दुरुस्तीच्या कामांना खीळ बसत आहे, असा आरोप पंचवटी प्रभागाच्या सभापती सुनीता शिंदे यांनी केला आहे. प्रभागात पन्नास हजार रुपयांची दुरस्तीची कामे वेळेत होत नाही तर नवीन कामे कशी होणार असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. प्रभागातील दुरुस्ती कामांचा अधिकार असला तरी तो केवळ कागदावरच असल्याचा खुलासा अधिकारी लोकप्रतिनिधींकडे करत असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडला आहे. प्रभागात एखाद्या कामाची दुरुस्ती करायची तर सुरुवातीला त्या कामाचा फोटो पाठवायचा मग नंतर ते काम मंजूर होईल व नंतर दुरुस्ती केली जाईल, असेच काहीसे धोरण सध्या प्रशासनाने सुरू केल्याने दुरुस्ती कामांना खीळ बसण्याबरोबरच नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. प्रभाग सभेमध्ये यापूर्वीदेखील अनेकदा नगरसेवकांसह सभापतींनी नाराजी दर्शविली आहे. मात्र अजूनही अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. (वार्ताहर)
प्रशासनाचे आडमुठे धोरण; दुरुस्ती कामांना खीळ
By admin | Updated: March 24, 2016 00:10 IST