नाशिक : येत्या शनिवारी पार पडणाऱ्या कुंभपर्वणीच्या पहिल्या शाही स्नानाच्या सोहळ्यासाठी शहरामध्ये सुमारे पंधरा हजारांहून अधिक पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबरोबरच दहा राज्य राखीव दल व चार जलद प्रतिसाद पथकाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह सर्वच पोलिसांची कुमक वाहतूक नियोजन व सुरक्षाव्यवस्था सांभाळण्यासाठी आज शुक्रवारपासून (दि.२७) रस्त्यांवर उतरली आहे.शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व शाहीस्नानाच्या पर्वणीसाठी शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी शहराची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहराबाहेरून आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांनी रंगीत तालीम पूर्ण करून घेतली आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष ठिकाणांवर घेऊन जात त्यांना आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन मार्ग, भाविक मार्ग, प्रशासकीय मार्ग, स्नानाचे घाट, नो-एन्ट्री, नो-व्हेईकल झोन आदिंची माहिती पोलीस बळाला पुरविण्यात आली आहे. दहा ते बारा पोलीस उपआयुक्त दर्जाचे अधिकारी, ३८ सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा हजार पोलीस कर्मचारी चोख कर्तव्य बजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांनी व्यक्त केला आहे. राज्य राखीव दलाच्या दहा तुकड्या प्रत्येकी तुकडीत शंभर यानुसार एक हजार जवान व जलद प्रतिसाद पथकाचे चारशे जवान (चार तुकड्या) शहरात दाखल झाले आहेत. सर्वच पोलीस फौजफाट्याला लागणारी आवश्यक ती सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात पंधरा हजारांहून अधिक पोलीस तैनात
By admin | Updated: August 28, 2015 00:17 IST